कौटुंबिक हिंसाचाराच्या असंख्य घटना वेळोवेळी समोर येत असतात. २१व्या शतकात शिक्षणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढूनही अनेक सुशिक्षित कुटुंबात देखील हुंडाबळीसारखे भीषण अपराध घडल्याचं समोर आलं आहे. महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणावर कितीही बोललं गेलं, तरी अशा घटना अजूनही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर किमान महिलांनी तरी महिलंसाठी उभं राहायलाच हवं, अशी साधारण अपेक्षा केली जाते. मात्र, जेव्हा एक महिलाच दुसऱ्या महिलेच्या मूलभूत अधिकारांचं हनन करते, त्याला समर्थन आणि प्रसंगी पाठबळ देते, तेव्हा त्यावरून वाद निर्माण होतो. असाच वाद मलेशियातील एका महिला केंद्रीय मंत्र्यानं केलेल्या विधानावरून निर्माण झाला आहे. यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं घडलं काय?
दी इंडिपेंडंटनं दिलेल्या वृत्तानुसार, मलेशियाच्या महिला व कुटुंब कल्याण विभागाच्या उपमंत्री सिती झैलाह मोहम्मद युसूफ यांनी एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सिती मोहम्मद युसूफ यांनी कौटुंबिक बाबींवर काही सल्ले दिले आहेत. त्यामध्ये त्यांनी केलेल्या विधानांवरून वाद निर्माण झाला आहे.
“नवऱ्यांनी त्यांच्या हट्टी बायकांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्याशी आधी बोललं पाहिजे. त्यानंतरही त्यांनी वर्तन सुधारलं नाही, तर नवऱ्यांनी तीन दिवस बायकांपासून वेगळं झोपावं. मात्र, त्यानंतर देखील पत्नीमध्ये कोणताही बदल न दिसल्यास नवऱ्याने तिला सावकाशपणे मारायला हवं. यातून आपण किती कडक शिस्तीचे आहोत आणि बायकोमध्ये बदल करण्यासाठी आपण किती आग्रही आहोत, हे दिसून येईल”, असं सिती मोहम्मद युसूफ या व्हिडीओमध्ये म्हणाल्या आहेत.
“बोलण्याआधी नवऱ्याची परवानगी घ्या”
सिती युसूफ एवढ्यावरच थांबल्या नसून त्यांनी महिलांना देखील सल्ला दिला आहे. “महिलांनी आपल्या पतीसोबत तेव्हाच बोलायला हवं, जेव्हा ते शांत असतील, त्यांचं जेवण झालं असेल, प्रार्थना करून झाली असेल आणि निवांत असतील. जेव्हा महिलांना बोलण्याची इच्छा असेल, तेव्हा त्यांनी आधी पतीकडून त्यासाठी परवानगी घ्यायला हवी”, असं देखील सिती युसूफ म्हणाल्या आहेत.
सिती युसूफ यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. काही नेटिझन्सनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरच प्रतिक्रिया दिल्या आहेत. “कोणत्याही मानवाला दुसऱ्या मानवाला मारहाण करण्याचा अधिकार नाही”, असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्या व्यक्तीने “मलेशियन महिलांसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. तुम्ही लवकरच राजीनामा द्याल आणि दुसऱ्या पात्र व्यक्तीला त्या पदावर बसू द्याल अशी अपेक्षा”, अशी प्रतिक्रिया सिती युसूफ यांच्या पोस्टवर दिली आहे.