मालदीवमधील काही मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भारतीयांवर केलेल्या अपमानास्पद टीकेनंतर मालदीवला भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मालदीवने आता नरमाईची भूमिका घेतली आहे. मालदीवच्या पर्यटन वभागाने एक निवेदन जारी करत भारताची माफी मागितली आहे. तसेच त्यांच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध नोंदवला आहे. अडचणींच्या काळात भारत हा आमच्या मदतीसाठी नेहमीच उभा राहिला आहे. या देशाबरोबरचे संबंध आम्हाला असेच कायम ठेवायचे असून अशा प्रकारच्या वक्तव्यांपासून आम्ही दूर राहू, असं या निवेदनात म्हटलं आहे.
मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्रीने (MATI) जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, आमच्या काही उपमंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नागरिकांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. भारत हा आमचा शेजारी आणि मित्र देश आहे. आमच्या संपूर्ण इतिहासात अनेक संकटकाळात भारताने सर्वात आधी प्रतिसाद दिला आहे. भारत सरकारने आणि भारतीय नागरिकांनी आमच्याशी जपलेल्या घनिष्ठ संबंधांबद्दल आम्ही भारताचे नेहमीच आभारी आहोत.
मालदीवच्या पर्यटन उद्योगात भारताचं मोठं आणि सातत्यपूर्ण योगदान आहे. करोना काळात लावलेले निर्बंध शिथील केल्यानंतर आम्ही पर्यटकांसाठी आमच्या देशाचे दरवाजे उघडले. त्यानंतर मालदीवच्या पर्यटनात भारताने मोठं योगदान दिलं आहे. भारत मालदीवसाठी प्रमुख बाजारपेठ म्हणून कायम आहे. उभय राष्ट्रांमधील घनिष्ठ मैत्रीचे संबंध यापुढेही कामय राहावेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळेच आपल्या संबंधांवर कुठलाही नकारात्मक परिणाम होईल अशा कृतीपासून आणि वक्तव्यांपासून आम्ही यापुढे दूर राहू.
पंतप्रधानांवरील अपमानास्पद टीका आणि नागरिकांवरील वर्णद्वेषी टीकेनंतर भारतीय नागरिक, कलाकार आणि खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा संताप व्यक्त केला. तसेच भारतीय नागरिकांकडून मालदीववर बहिष्कार घालण्याचं, पर्यटनासाठी मालदीवला न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. अशातच अनेक भारतीयांनी त्यांची मालदीववारी रद्द केली आहे. तसेच भारतातल्या काही आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल कंपन्यांनीदेखील मालदीवसाठी बुकिंग्स घेणं बंद केलं आहे. तर काही ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवसाठी लोकांनी केलेले बुकिंग्स रद्द केले आहेत. परिणामी, मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसणार असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. त्यामुळे मालदीवच्या पर्यटन विभागाने भारताची माफी मागितली आहे.
हे ही वाचा >> “मालदीवशी व्यवसाय बंद करा”, भारतातील व्यावसायिकांच्या शिखर संघटनेचं आवाहन; मंत्र्यांच्या विधानांचा फटका देशाला बसणार?
ईजमायट्रिपने सर्व बुकिंग्स रद्द केले
देशातली मोठी ट्रॅव्हल कंपनी ईजमायट्रिपने मालदीवसाठी बूक केलेली विमानाची सर्व तिकिटं रद्द केली आहेत. कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ निशांत पिट्टी यांनी स्वतः समाजमाध्यमांद्वारे याबाबतची माहिती दिली. निशांत पिट्टी म्हणाले, आपल्या राष्ट्राच्या एकात्मतेसाठी ईजमायट्रीपने मालदीवच्या सर्व फ्लाईट बुकिंग्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.