Maldives India Controversy : मालदीवमधील मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली अपमानास्पद टीका आणि भारतीय नागरिकांवर केलेल्या वर्णद्वेषी टीकेनंतर भारतात मालदीवविरोधात संतापाचं वातावरण आहे. तसेच भारतीय नागरिकांनी, पर्यटन कंपन्यांनी मालदीववर बहिष्कार टाकण्याची भाषा सुरू केली आहे. काही कंपन्यांनी तर मालदीवचे बुकिंग्स रद्द केले आहेत. त्यामुळे एका बाजूला भारत सरकारचा रोष आणि दुसऱ्या बाजूला भारतीय नागरिकांची ‘बॉयकॉट मालदीव’ ही मोहीम पाहता मालदीवचं सरकार नरमलं आहे. यावर आता मालदीवमधूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालदीवच्या खासदार इवा अब्दुल्ला यांनी मालदीवमधील मंत्र्यांनी केलेली वक्तव्ये ‘लाजिरवाणी आणि वर्णद्वेषी’ असल्याचं म्हणत आपल्याच सरकारला खडसावलं आहे. तसेच, भारताची माफी मागत मालदीवरील बहिष्कार मोहीम थांबवण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, मालदीवचे माजी युवा कल्याण आणि क्रीडामंत्री अहमद महलूफ यांनीदेखील भारताची माफी मागितली आहे. महलूफ म्हणाले, भारतीयांनी पर्यटनस्थळ म्हणून मालदीववर बहिष्कार घातला तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होईल. मालदीव हा नेहमीच भारताचा मित्र आणि चांगला शेजारी असेल. मालदीवमध्ये नेहमीच भारतीयांचं स्वागत केलं जाईल. मालदीवचा एक सामान्य नागरिक म्हणून मी मालदीवच्या काही लोकांनी भारतीय नागरिक आणि भारताच्या पंतप्रधानांबद्दल केलेल्या वर्णद्वेषी टीप्पणीबद्दल माफी मागतो.

अहमद महलूफ म्हणाले, आमच्या शेजाऱ्यांबद्दल आमच्याच देशातील काही लोकांनी केलेल्या टिप्पण्यांबद्दल मला चिंता वाटते. भारतीयांनी मालदीवर बहिष्कार टाकल्यास याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. अशा मोहिमेनंतर (बॉयकॉट) आपल्याला सावरणं अवघड होईल. मी मालदीव सरकारला हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची विनंती करतो, तसेच याप्रकरणी गांभीर्याने पावलं उचलण्याचं आवाहन करतो. भारत हा आमचा शेजारी आहे. आमचंही भारत आणि भारतीयांवर प्रेम आहे. मालदीवमध्ये नेहमीच त्यांचं स्वागत आहे.

हे ही वाचा >> India-Maldives Row : मालदीववर भारतीयांचा संताप, EaseMyTrip कडून सर्व बुकिंग्स रद्द; सीईओ म्हणाले, “आपल्या राष्ट्राच्या…”

खासदार इवा अब्दुल्ला यांनी भारतीयांची माफी मागितली

दुसऱ्या बाजूला, मालदीवमधील खासदार इवा अब्दुल्ला म्हणल्या, “आपल्या मंत्र्यांनी केलेल्या विधानांवर भारतीयांचा संताप मी समजू शकते. मंत्र्यांनी केलेली वक्तव्ये संतापजनक आहेत. या लाजिरवाण्या वक्तव्यांप्रकरणी मी भारतीय नागरिकांची माफी मागते.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maldives ex minister ahmed mahloof says indians boycott will impact us hard asc