पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध बिघडले आहेत. मालदीवच्या काही उपमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नागरिकांवर टीका केल्याने भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार घातला. अनेक पर्यटन कंपन्यांनीही त्यांचे मालदीवचे बुकिंग्स रद्द केले. परिणामी मालदीवला आता उपरती झाली असून मालदीवच्या पर्यटन विभागाने माफीनामाही प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणीही मालदीवचे अल्पसंख्याक नेता अली अजीम यांनी केली आहे.
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्ज यांना हटवण्याकरता अल्पसंख्याक नेता आणि खासदार अली अजीम यांनी मागणी केली. मुइज्जू यांना पदावरून बेदखल करण्याकरता मदत करण्याची विनंती त्यांनी मालदीवच्या नेत्यांना केली आहे. मालदीवच्या परराष्ट्र धोरणात स्थिरता राखण्यासाठी आमचा मालदीवियन डेमॉक्रॅटिक पार्टी पक्ष कटिबद्ध आहे, असं अली अजीम म्हणाले. आम्ही कोणत्याही शेजारी देशाला आमच्या परराष्ट्र धोरणापासून वेगळे होऊ देणार नाही. राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यास सरकार तयार आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली.
पर्यटन विभागाचा माफीनामा
भारताशी पंगा घेतल्याने मालदीवला मोठा फटका बसला आहे. मोठ्या संख्येने भारतीय पर्यटकांचे बुकिंग रद्द केल्यानंतर आणि ट्रॅव्हल कंपन्यांनी विरोध केल्यानंतर आता मालदीवच्या टुरिझम असोसिएशननेही आपल्या मंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्रीने एक निवेदन जारी करून आपल्या मंत्र्यांच्या भारतीय पंतप्रधान आणि भारतातील लोकांविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.
हेही वाचा >> पर्यटनाला फटका बसताच मालदीवचा माफीनामा; मंत्र्यांचा निषेध करत म्हणाले, “आम्ही यापुढे…”
मालदीव टुरिझम असोसिएशनने म्हटलं की, भारत हा आपला जवळचा शेजारी आणि मित्र आहे. इतिहासात जेव्हा जेव्हा आपला देश संकटात सापडला तेव्हा आपल्याला भारताने पहिली मदत केली. सरकारसोबत आम्ही भारतातील जनतेचेही आभारी आहोत की त्यांनी आमच्याशी इतके घनिष्ठ संबंध निर्माण केले आहेत. मालदीवच्या पर्यटन क्षेत्रातही भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामुळे आमच्या पर्यटन क्षेत्राला कोविड १९ नंतर सावरण्यास खूप मदत झाली. मालदीवसाठी भारत ही प्रमुख बाजारपेठ आहे.
मालदीवच्या टीकेविरोधात भारतीय एकवटले
पंतप्रधानांवरील अपमानास्पद टीका आणि नागरिकांवरील वर्णद्वेषी टीकेनंतर भारतीय नागरिक, कलाकार आणि खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा संताप व्यक्त केला. तसेच भारतीय नागरिकांकडून मालदीववर बहिष्कार घालण्याचं, पर्यटनासाठी मालदीवला न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. अशातच अनेक भारतीयांनी त्यांची मालदीववारी रद्द केली आहे. तसेच भारतातल्या काही आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल कंपन्यांनीदेखील मालदीवसाठी बुकिंग्स घेणं बंद केलं आहे. तर काही ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवसाठी लोकांनी केलेले बुकिंग्स रद्द केले आहेत. परिणामी, मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसणार असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. त्यामुळे मालदीवच्या पर्यटन विभागाने भारताची माफी मागितली आहे.