पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपचा दौरा करून त्याचे काही फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यानंतर मालदीवमधील नव्या सरकारमधील नेत्यांनी त्यावर वादग्रस्त टिप्पणी केली. यावरून आता चांगलाच वाद पेटला असून मालदीव सरकारने याबाबत अधिकृत भूमिकाही जाहीर केली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते झाहिद रमीझ यांनी मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर टीका करताना भारत पैसे कमविण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत असल्याचे म्हटले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालदीवमधील सत्ताधारी पक्षाचे नेते झाहिद रमीझ यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर म्हटले की, भारतासारखा मोठा देश श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या पर्यटन शैलीची नक्कल करून पैसे कमविण्याचा प्रयत्न करत आहे. ही खेदाची बाब आहे.” रमीझ हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ५ जानेवारी आणखी एक पोस्ट केली होती. ज्यात ते म्हणतात की, मोदींच्या लक्षद्वीप भेटीमुळे मालदीवला मोठा फटका बसणार आहे.

हे वाचा >> विश्लेषण : मालदीवच्या अध्यक्षांकडून भारतीय सैन्याला माघारीचे आदेश का? चीन धार्जिणेपणातून निर्णय?

रमीझ पुढे म्हणाले की, लक्षद्वीपचे पर्यटन तुम्हाला वाढवायचे हे मान्य. पण ही भ्रामक कल्पना आहे. आम्ही ज्या प्रकारे सेवा पुरवितो, त्या प्रकारची सेवा लक्षद्वीप देऊ शकते का? ते स्वच्छता पाळू शकतात का? हॉटेलच्या खोल्यामध्ये एकप्रकारचा वास येतो, त्याचे काय करणार?

पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर सोशल मीडियावर या फोटोंना चांगली प्रसिद्धी मिळाली. अनेकांनी लक्षद्वीपची तुलना मालदीव आणि इतर ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्याशी केली. समुद्रकिनाऱ्याच्या पर्यटनासाठी मालदीव हे प्रसिद्ध असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी तिथे जात असतात. मालदीवच्या सत्ताधाऱ्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या विधानानंतर सोशल मीडियावर मात्र संतापाची लाट पसरली आहे. अनेकांनी बायकॉट मालदीव अशी मोहीम सुरू केली आहे.

आकाराने लहान असले तरी लक्षद्वीपचे हृदय मात्र विशाल, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

भारत-मालदीव संबंध तणावपूर्ण

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी मोहम्मद मुइझू निवडून आल्यानंतर मागच्या काही महिन्यांपासून भारत-मालदीवच्या संबंधांमध्ये मीठाचा खडा पडला आहे. नोव्हेंबर २०२३ साली मुइझू यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. पदावर येताच त्यांनी भारताशी संबंध असलेले धोरण बदलण्याची घोषणा केली. त्यात पहिलाच निर्णय त्यांनी घेतला की, मालदीवमध्ये असलेले भारतीय लष्करी अधिकारी पुन्हा मायदेशी पाठविले. मोहम्मद मुइझू हे चीनधार्जिणे असल्याचे अनेकवेळा बोलले गेले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maldives minister mocks pm modis lakshadweep visit remarks spark row kvg