मालदीवच्या संसदेत रविवारी खासदारांमध्ये झटापट पाहायला मिळाली. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळात चार मंत्र्यांची नेमणूक करण्यासाठी आज संसदेत मतदान होणार होते. पण विरोधी पक्षाने त्यावर आक्षेप घेतल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये झटापट झाली, अशी बातमी सन ऑनलाईनने दिली आहे. मालदीवमध्ये पिपल्स नॅशनसल काँग्रेस (PNC) आणि प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (PPM) हे दोन सत्ताधारी पक्ष आहेत. तर माजी अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा मालदीवन डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) हा पक्ष विरोधात आहे. विरोधात असलेल्या पक्षाचे मालदीवच्या संसदेत सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त खासदार आहेत. त्यामुळे बहुमताच्या जोरावर विद्यमान अध्यक्ष मुइज्जूंची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्याचे पर्यवसन खासदारांच्या हाणामारीत झाले.
भारत-मालदीव तणावादरम्यान मोहम्मद मुइज्जूंचा मोदी सरकारला इशारा, १५ मार्चचा अल्टीमेटम देत म्हणाले…
मालदीवमधील वृत्तसंस्थेने या हाणामारीचे व्हिडिओ एक्सवर शेअर केले आहेत. एमडीपीचे खासदार इसा आणि पीएनसीचे खासदार अब्दुल्ला शहीम अब्दुल हकीम यांच्यात झटापट झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. सत्ताधारी पक्षाचे शहीम हे इसा यांचा पाय धरून खेचत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर इसा यांनी शहीम यांना मारहाण केली. ज्यामुळे शहीम जखमी झाले. त्यांना संसदेतून थेट रुग्णालयात नेण्यात आले.
मालदीवच्या संसदेत राडा कशासाठी?
संसदेतील विरोधी पक्षाच्या खासदारांनी अध्यक्ष मुइज्जू यांच्याविरोधात भूमिका घेतली असून नव्या मंत्र्यांची नेमणूक करण्यास विरोध केला आहे. तसेच संसदेच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली. मुइज्जू यांच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांची नेमणूक करू नये, अशी मागणी विरोधकांनी केली.
“आम्हाला धमकावण्याचा परवाना…”, चीनवरून परतल्यावर मालदीवच्या अध्यक्षांनी भारताकडे डोळे वटारले
विरोधक बहुमतात कसे?
मालदीवमध्ये खासदार आणि अध्यक्ष यांच्या निवडणुका वेगवेगळ्या होतात. २०१९ साली मालदीवमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. ज्यामध्ये एमडीपी पक्षाला बहुमत मिळाले. मात्र मागच्या वर्षी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पिपल्स नॅशनल काँग्रेसचे मुईज्जू अध्यक्षपदी निवडून आले. त्यामुळे ते सत्ताधारी असले तरी त्यांचे संसदेत बहुमत नाही. १७ मार्च २०२४ रोजी मालदीवमध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
मुइज्जू यांची भारतविरोधी भूमिका
२०१९ साली निवडून आलेले सोलिह यांनी भारताला देशात अर्निंबध वावर करण्याची मोकळीक दिल्याचा आरोप मुइज्जू यांनी केला होता. मुईज्जू यांचा पीपल्स नॅशनल काँग्रेस हा पक्ष पूर्णपणे चीनधार्जिणा मानला जातो. मालदीवमध्ये भारतीय लष्कराची उपस्थिती ही केवळ दोन सरकारांमधील करारानुसार जहाजबांधणीची गोदी बांधण्याकरिता होती आणि आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचा भंग होणार नाही, असे सोलिह यांनी वारंवार सांगितले होते. याउलट, आपण ही निवडणूक जिंकल्यास भारतीय फौजांना मालदीवमधून हटवू आणि मोठ्या प्रमाणात भारताला अनुकूल असलेल्या देशाच्या व्यापार संबंधांचे संतुलन साधू, असे आश्वासन मुईझ यांनी दिले आणि ते निवडून आले.