मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पणीनंतर मालदीवची पर्यटन कोंडी करण्याचे सूर भारतातून उमटू लागले आहेत. मालदीवमध्ये भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात जात असतात. परंतु, भारतीय पर्यटक आणि पर्यटन कंपन्यांनी बुकिंग रद्द केल्याने मालदीवच्या पर्यटन विभागाला मोठा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. या दरम्यान, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी चीनकडे मोर्चा वळवला आहे. मालदीवमध्ये पर्यटक पाठवण्याची मागणी चीनकडे करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे चीन दौऱ्यावर आहेत. चीनच्या फुजियान प्रांतातील मालदीव बिझनेस फोरममध्ये मोइज्जू बोलत होते. तसंच,चीन हा मालदीवचा सर्वांत जवळचा मित्र असल्याचंही त्यांनी म्हटलं. ते म्हणाले, “चीन हा आपला सर्वात जवळचा मित्र आणि विकास भागीदार आहे.”

कोविडपूर्वी चीन आमची (मालदीवची) प्रथम क्रमांकाची बाजारपेठ होती. चीनला हे स्थान परत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माझी विनंती आहे, असं अधिकृत संकेतस्थळावरील प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. मुइज्जू यांनी चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) प्रकल्पाचेही कौतुक केले आणि त्यात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. दोन्ही देशांनी हिंदी महासागर बेटावर एकात्मिक पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी USD ५० दशलक्ष प्रकल्पावर स्वाक्षरी केली आहे.

हेही वाचा >> मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना भारताशी पंगा घेणं भोवणार? सत्ताधारी खासदाराकडूनच अविश्वास प्रस्तावाची मागणी

नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप दौऱ्यावर होते. लक्षद्वीपर दौऱ्याचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांवर टीका केली. एवढंच नव्हे तर भारतीयांवर वर्णद्वेषी टीकाही करण्यात आली. यावरून भारतीय नागरिक, कलाकार आणि खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा संताप व्यक्त केला. तसेच भारतीय नागरिकांकडून मालदीववर बहिष्कार घालण्याचं, पर्यटनासाठी मालदीवला न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. अशातच अनेक भारतीयांनी त्यांची मालदीववारी रद्द केली आहे. तसेच भारतातल्या काही आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल कंपन्यांनीदेखील मालदीवसाठी बुकिंग्स घेणं बंद केलं आहे. तर काही ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवसाठी लोकांनी केलेले बुकिंग्स रद्द केले आहेत. परिणामी, मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसणार असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. त्यामुळे मालदीवच्या पर्यटन विभागाने भारताची माफी मागितली आहे.

२०२३ मध्ये भारतातून मालदीवमध्ये सर्वाधिक पर्यटक

२०२३ मध्ये मालदीवमध्ये भारतामधून २ लाखांहून अधिक पर्यटक गेले होते. त्यानंतर रशिया दुसऱ्या स्थानावर आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर होता. भारताने बहिष्कार घातल्याने मालदीवचे बुकिंग्स रद्द करण्यात आले आहे. परिणामी भारतीयांचा ओढा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालदीवचा पर्यटन व्यवसाय सुरळीत राहण्याकरता मालदीवने आता चीनकडे पर्यटनावाढीची मागणी केली आहे.

हेही वाचा >> पर्यटनाला फटका बसताच मालदीवचा माफीनामा; मंत्र्यांचा निषेध करत म्हणाले, “आम्ही यापुढे…”

मोइज्जू यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्ज यांना हटवण्याकरता अल्पसंख्याक नेता आणि खासदार अली अजीम यांनी मागणी केली. मुइज्जू यांना पदावरून बेदखल करण्याकरता मदत करण्याची विनंती त्यांनी मालदीवच्या नेत्यांना केली आहे. मालदीवच्या परराष्ट्र धोरणात स्थिरता राखण्यासाठी आमचा मालदीवियन डेमॉक्रॅटिक पार्टी पक्ष कटिबद्ध आहे, असं अली अजीम म्हणाले. आम्ही कोणत्याही शेजारी देशाला आमच्या परराष्ट्र धोरणापासून वेगळे होऊ देणार नाही. राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यास सरकार तयार आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maldives president urges china to send more tourists after backlash from indians sgk