पीटीआय, नवी दिल्ली, माले

परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी मालदीवच्या भारतातील राजदूतांना पाचारण केले आणि मालदीवमधील काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध समाजमाध्यमांवर केलेल्या शेरेबाजीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.मोदी यांच्याविरुद्ध समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल मालदीव सरकारने रविवारी तीन उपमंत्र्यांना निलंबित केले होते. मोदी यांची लक्षद्वीप भेट म्हणजे या केंद्रशासित प्रदेशाला मालदीवचे पर्यायी पर्यटन स्थळ म्हणून दर्शवण्याचा प्रयत्न होता, असा निष्कर्ष काढून त्यांनी मोदींबद्दल ‘एक्स’वर अपमानास्पद शेरेबाजी केली होती.

निलंबित उपमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध व्यक्त केलेली अपमानास्पद मते मालदीवच्या दृष्टीकोनाचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असा खुलासा मालदीव सरकारने सोमवारी भारताचे तेथील राजदूत मुनु मुहावर यांच्याकडे केला.

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचा चौथ्यांदा ऐतिहासिक विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट फोन, म्हणाले…

‘भारतीय राजदूत मुनु मुहावर यांनी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करण्यासाठी मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयातील स्वतंत्र राजदूत डॉ. अली नासीर मोहम्मद यांची सोमवारी पूर्वनिर्धारित भेट घेतली’, असे भारतीय राजदूतावासाने ‘एक्स’वर लिहिले.

मालदीवचा आपल्या शेजारी देशाला पाठिंबा कायम राहील असे आवर्जून सांगितल्याची माहिती मालदीव सरकारच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.