मालेगाव बॉम्बस्फोटातील नऊ मुस्लिम आरोपींबद्दल आपल्याकडे सबळ पुरावे नसल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दोन वर्षांपूर्वी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाला सांगितले होते. मंगळवारी एनआयएने आपल्या आधीच्या भूमिकेवरून घुमजाव करत या नऊ मुस्लिमांच्या सुटकेला विरोध दर्शवला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील या प्रकरणी २५ एप्रिलला निर्णय देणार आहेत. मात्र, एनआयएने दोन वर्षांत आपल्या आधीच्या भूमिकेवरून घुमजाव केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
एनआयएचे वकील प्रकाश शेट्टी यांनी न्यायालयाला सांगितले की, या खटल्याचा तपास तीन स्वतंत्र यंत्रणांमार्फत करण्यात येतो आहे. राज्यातील दहशतवादविरोधी विभाग आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांनी केलेल्या तपासात एका गटाचा उल्लेख करण्यात आला होता. पण एनआयएकडून करण्यात आलेल्या तपासात नव्या बाजू पुढे आल्या आहेत. पण आधीच्या तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात आरोपी करण्यात आलेल्यांची सुटका केली जावी का? असा प्रश्न आहे. सुटका करण्यात येऊ नये, असे एनआयएला वाटते. या आरोपींविरोधात कोणते पुरावे आहेत हे न्यायालयही तपासत आहे. त्यामुळे या टप्प्यावर तरी त्यांची सुटका करण्यात येऊ नये.
या नऊ मुस्लिमांमध्ये नूरूल हुडा, शब्बीर अहमद, रईस अहमद, सलमान फार्सी, फरोघ मगदुमी, शेख मोहम्मद अली, असीफ खान, मोहम्मद झाहीद आणि अब्रार अहमद यांचा समावेश आहे. या सर्वांना २००६ मध्ये बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
यापैकी दोघांना मुंबईतील २००६मधील ७/११ बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरविण्यात आल्याने त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शब्बीर अहमद याचा गेल्यावर्षी अपघातात मृत्यू झाला. एकाला मंगळवारी न्यायालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली होती. उर्वरित सर्व पाच आरोपी न्यायालयात उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा