एनआयएच्या कोणत्या अधिकाऱ्याने मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्यास सांगितले त्याचे नाव माजी विशेष सरकारी वकील अॅड. रोहिणी सालियन यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये (एनआयए) अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या सुहास वर्के यांनीच आपल्याला या खटल्यामध्ये सौम्य भूमिका घेण्यास सांगितले होते, असा आरोप सालियन यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये सालियन यांनी हे नाव दिले आहे.
केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्यास मला ‘राष्ट्रीय तपास संस्थे’च्या (एनआयए) अधिकाऱ्याने सांगितल्याचा आरोप या खटल्यातील तत्कालिन विशेष सरकारी वकील अ‍ॅड. रोहिणी सालियन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. सालियन म्हणाल्या की, ‘एनआयए’च्या एका अधिकाऱ्याने प्रथम मला दूरध्वनी केला. त्यानंतर त्याने मला भेटायची इच्छा व्यक्त केली. प्रत्यक्ष भेटीत, या खटल्यातील आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्याची सूचना त्याने मला केली. मला अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून मिळाल्याचेही त्याने सांगितले.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि इंदिरा जयसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी याचिकेद्वारे केली. त्यानंतर न्यायालयाने केंद्र, राज्य सरकार आणि एनआयएला नोटीस बजावली होती. त्या पार्श्वभूमीवर सालियन यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी सुहास वर्के यांचे नाव दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा