देशभरात स्वयंघोषित गोरक्षकांकडून सुरू असलेल्या उच्छादाचे लोण आता महाराष्ट्रातही येऊन पोहचले आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये गोरक्षकांकडून गोमांस बाळगल्याच्या संशयावरून काही मांसविक्रेत्यांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मालेगावमध्ये २६ मे रोजी ही घटना घडली होती. मोबाईल कॅमेऱ्यावर चित्रीत करण्यात आलेला हा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेच्या हाती लागला आहे. या व्हिडिओत गोरक्षकांकडून काही लोकांना शिवीगाळ आणि मारहाण होताना दिसत आहे. त्याबरोबरच हे गोरक्षकांकडून या मांसविक्रेत्यांना ‘जय श्रीराम’ बोलण्याची सक्तीही केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने २०१५ मध्ये राज्यभरात गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू केला होता. त्यामुळे राज्यात गोमांस बाळगणे हा कायदेशीर गुन्हा आहे.
#WATCH: Cow vigilantes thrash 2 traders for allegedly possessing beef in Malegaon area of Maharashtra's Washim(26/5) (NOTE: STRONG LANGUAGE) pic.twitter.com/7L2eZRjhlE
— ANI (@ANI_news) May 29, 2017
गेल्या काही दिवसांमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह देशभरात अनेक ठिकाणी गोरक्षकांच्या गुंडगिरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याशिवाय, सरकारकडून आठवडी बाजारात कत्तलीसाठीच्या जनावरांची खरेदी-विक्री करण्यावर घालण्यात आलेल्या बंदीमुळे नवा वाद उद्भवला आहे. या बंदीमागे गोमांसबंदीचा निर्णय अप्रत्यक्षपणे राबवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत केरळ आणि मद्रासमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मद्रासच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) बीफ महोत्सव आयोजित करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काल रात्री पार पडलेल्या या बीफ महोत्सवात संस्थेतील साधारण ५० विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी २७ मे रोजी स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) कार्यकर्त्यांकडून त्रिवेंद्रम विद्यापीठाबाहेर अशाचप्रकारचे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर केरळात अनेक ठिकाणी बीफ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
मालेगावात भाजपचे मुस्लिम कार्ड फेल; काँग्रेसला सर्वाधिक जागा
यावरून आम्ही काय खावे हे दिल्ली आणि नागपूरकरांनी शिकवू नये असे सांगत केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. केरळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना त्यांनी भाजपच्या निर्णयावर सडकून टीका केली. केंद्रात सत्तेत असणारे सरकार आपल्या भूमिका देशभरात लादू पहात आहेत. मात्र केरळमधील लोकांच्या खाण्याच्या सवयी अतिशय चांगल्या असून दिल्ली आणि नागपूर मधून केरळी लोकांना खाण्याच्या बाबतीतले धडे घेण्याची आवश्यकता नाही, असे विजयन यांनी सांगितले.
सत्तेत आल्यास गोमांस बंदी उठवू; मालेगावातील भाजप उमेदवारांचे आश्वासन