‘२६/११’ हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अबू जुंदाल हा भारतीय गुप्तचर संस्थेचा सदस्य होता, असा दावा करून खळबळ उडवण्याचा प्रयत्न करणारे पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी आपल्या भारत दौऱ्यादरम्यान रविवारी आणखी मुक्ताफळे उधळली. २६/११चा मुंबई हल्ला हा भारतीय सुरक्षा यंत्रणांचे अपयश असल्याचे सांगतानाच अबू जुंदाल, फहीम अन्सारी, जबिउल्लाह या भारतीय दहशतवाद्यांनीच हा कट रचल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, अजमल कसाब,लष्कर ए तय्यबाचा प्रमुख झकी उर रेहमान लख्वी व हाफिझ सईद या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा चुकार उल्लेखही त्यांनी केला नाही.
‘२६/११चा मुंबई हल्ला कोणत्याही एका देशाच्या भूमीवर, एका देशाच्या नागरिकांनी रचलेला कट नाही. डेव्हिड हेडलीने अल कायदाचा दहशतवादी इलियास काश्मिरी, पाकिस्तानी लष्कराचा माजी अधिकारी आणि अबू जुंदाल, जबिउल्लाह व फहीम अन्सारी या तीन भारतीय दहशतवाद्यांच्या साथीने हा कट आखला,’ असे मलिक रविवारी म्हणाले. मात्र, हे विधान करताना कसाब व त्याचे दहशतवादी सहकारी, हाफिझ सईद, लख्वी यांची नावेही त्यांनी घेतली नाहीत. उलट, भारताने हाफिझ सईदविरोधात योग्य पुरावेच दिले नाहीत, असे तुणतुणे त्यांनी मायदेशी परतल्यावर वाजवले. ‘कसाबला फाशी देण्याचा भारत सरकारचा निर्णय आम्ही मान्य केला. त्याप्रमाणे सईदला जामिनावर सोडण्याचा पाकिस्तानी न्यायालयाचा निकाल भारताने मान्य केला पाहिजे,’असेही ते म्हणाले. हा हल्ला भारतीय सुरक्षा यंत्रणांचे अपयश असल्याचे ते म्हणाले. ‘हे दहशतवादी भारतात मुक्तसंचार करत होते आणि सुरक्षायंत्रणांना याचा मागमूसही नव्हता, असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा