पीटीआय, हैदराबाद : काँग्रेसच्या नव्या कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) पहिली बैठक शनिवारी हैदराबादमध्ये पार पडली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबाबतचे पक्षीय धोरण, पक्ष संघटना आणि इतर अनेक मुद्दय़ांवर विचारमंथन करण्यात आले. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूर हिंसाचार, हरियाणा आणि इतर काही राज्यांतील जातीय तणावाच्या आणि हिंसाचाराच्या अलीकडे झालेल्या घटनांचा उल्लेख करताना देश गंभीर अंतर्गत आव्हानांनी वेढला असून, भाजप या आगीत तेल ओतत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) कार्यकारी समितीद्वारे आव्हान देण्याच्या तयारीत काँग्रेस आहे. कार्यकारिणीच्या बैठकीसोबतच काँग्रेस तेलंगणासाठी सहा ‘वचने’ जाहीर करणार आहे. यावेळी खरगेंसह माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखिवदर सिंह सुखू आणि पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. खरगे यांच्या हस्ते कार्यकारी समितीच्या बैठकीपूर्वी पक्ष ध्वजवंदन करण्यात आले.
खरगे यांनी सांगितले, की सरकारने २०२१ ची जनगणना जातनिहाय केली पाहिजे. जेणेकरून दुर्बल घटकांना अन्न सुरक्षा कायदा आणि इतर योजनांबाबत पूर्ण अधिकार मिळू शकतील. या बैठकीपूर्वी खरगे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले, की या बैठकीत पक्षसंघटनेबाबत अधिक विचारविनिमय होईल. सोनिया आणि राहुल गांधींसह सर्व ज्येष्ठ नेते या बैठकीत सहभागी होतील. सर्वजण पक्ष संघटना आणि पाच राज्यांतील निवडणुकांबाबत रणनीती ठरवणार आहेत.
काँग्रेसने २० ऑगस्ट रोजी आपल्या कार्यकारिणीची (कार्यकारी समिती) पुनर्रचना केली होती. ज्यात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. कार्यकारी समितीत ३९ सदस्य, ३२ स्थायी निमंत्रित आणि १३ विशेष निमंत्रितांचा समावेश आहे. सचिन पायलट आणि शशी थरूर या नेत्यांना या कार्यकारिणीत प्रथमच स्थान मिळाले आहे.
भाजपला ‘विरोधकविहीन संसद’ हवी आहे -खरगे
बैठकीत संसदेच्या विशेष अधिवेशनाचा संदर्भ देत खरगे यांनी दावा केला, की सत्ताधारी भाजपला ‘विरोधकविहीन संसद’ हवी आहे. त्यामुळे त्यांच्या हेतूंबाबत सदैव सावध राहणे आवश्यक आहे. अनेक विरोधी नेत्यांवर सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या कारवाईवरून खरगे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. खरगे म्हणाले, की पंतप्रधान मोदी आणि भाजप सातत्याने विरोधी आघाडी ‘इंडिया’वर करत असलेली टीका हे ‘इंडिया’च्या गेल्या तीन बैठकांचे यशच आहे.