भारतीय जनता पार्टीविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली देशातल्या २६ विरोधी पक्षांची आज बंगळुरू येथे बैठक पार पडली. गेल्या महिन्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथे आयोजित केलेल्या विरोधकांच्या पहिल्या बैठकीनंतर आज दुसरी बैठक पार पडली. आजच्या बैठकीत विरोधकांच्या या एकजुटीला ‘इंडिया’ (INDIA) असं नाव देण्यात आलं आहे. India या संक्षिप्त रुपाचा पूर्ण अर्थ (फुल फॉर्म) इंडियन नॅशनल डेव्हलपमेन्ट इन्क्लुझिव्ह अलायन्स असा आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर या नावाची घोषणा केली. या बैठकीला महाराष्ट्रातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.
विरोधकांची आघाडी तयार झाली असली तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांसमोर एक प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे, हा प्रश्न म्हणजे विरोधकांच्या आघाडीचा चेहरा कोण असेल. विरोधकांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीसुद्धा हाच प्रश्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विचारला. विरोधकांचं नेतृत्व कोण करणार, ‘इंडिया’चा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारल्यानंतर खरगे म्हणाले, हा प्रश्न नेहमीच विचारला जातोय. मुंबईत होणाऱ्या बैठकीत आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेणार आहोत. तिथे आम्ही आमच्या समन्वयकांची निवड करू. आमचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न सोडवणं फार अवघड नाही.
हे ही वाचा >> ब्रिजभूषण सिंह यांना दिलासा, कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आम्ही ११ जणांची समन्वय समिती बनवणार आहोत. या ११ जणांच्या बैठकीत ठरवलं जाईल की आमचा मुख्य समन्वयक कोण असेल. मुंबईत आमची बैठक होईल, तिथे याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. आमचं नेतृत्व कोण करेल हा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही. हा तिढा खूप लवकर सुटेल. ‘इंडिया’ची पुढची बैठक महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे होईल. आम्ही आता २६ पक्ष एकत्र आलो आहोत. आधीच्या पाटणा येथील बैठकीत २० पक्ष आले होते. आमची २६ पक्षांची एकजूट पाहून पंतप्रधान मोदी आणि भाजपा चिंतेत आहे.