त्रिपुरा येथे भाजपाच्या ‘जनविश्वास’ यात्रेदरम्यान बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्या येथे निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराची तारीख जाहीर केली होती. १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचे उद्घाटन होईल, असे ते म्हणाले होते. दरम्यान यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी अमित शाहांवर टीकास्र सोडले आहे. राम मंदिराचे उद्घाटन करणारे तुम्ही कोण? असा प्रश्न खरगे यांनी विचारला आहे.
हेही वाचा – “आम्ही रामवाले, जय श्रीरामवाले नाही”, RJD चा BJP वर हल्लाबोल
काँग्रेसची भारत जोडो यात्रा हरियाणात असून पाणीपत येथे झालेल्या सभेत बोलताना खरगे यांनी भाजपा सरकारवर टीकास्र सोडले. यावेळी त्यांनी अमित शाहांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. “अमित शाहांनी राम मंदिराचे उद्घाटन १ जानेवारी २०२४ रोजी होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, ही तारीख घोषित करणारे अमित शाह कोण आहेत? ते मंदिराचे पुजारी आहेत की महंत आहेत? या देशात प्रत्येकाची देवावर श्रद्धा आहे. मात्र, राम मंदिराची घोषणा अमित शाह का करत आहेत? हा अधिकार त्यांना कोणी दिला? अशी टीका त्यांनी केली. तसेच अमित शाह हे राजकीय नेते असून पुजारी नाहीच. त्यांनी त्यांचं काम करावं आणि पुजारांना पुजाऱ्याचे काम करू द्यावे”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारलाही लक्ष्य केलं. “मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. मोदी सरकारने देशात दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, तेसुद्धा या सरकारने पूर्ण केलं नाही. मोदी सरकारने प्रत्येकाला १५ लाख रुपये देण्याचेही म्हटलं होतं. मात्र, त्याचं पुढं काय झालं माहिती नाही. त्यामुळे हे सरकार केवळ निवडणुकीच्या वेळी घोषणा करते. मोदी सरकार केवळ जुमला सरकार आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.