बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत राज्यसभेत जे वक्तव्य केले त्याची चूक मान्य करण्यास सरकार किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार नाहीत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. घटनेच्या शिल्पकारांच्या सन्मानासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करेल, अशी ग्वाही खरगे यांनी दिली. तसेच पक्ष संघटनेत नव्यांना संधी देऊन, स्थानिक नेतृत्व बळकट केले जाईल असे त्यांनी जाहीर केले.

काँग्रेस कार्यकारिणीच्या येथील बैठकीच्या उद्घाटनावेळी खरगे यांनी भाजपवर चौफेर टीका केली. महात्मा गांधी यांनी बेळगाव येथे काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्याच्या घटनेला शंभर वर्षे झाली. त्यानिमित्त पक्षाने येथे ‘नव सत्याग्रह बैठकी’चे आयोजन केले आहे. या बैठकीत पुढील वर्षाच्या पक्ष कार्यक्रमाची कृती योजना आखली जाईल. निवडणूक आयोगासह सर्व घटनात्मक संस्थांवर नियंत्रण असून, जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडत असल्याची बाब चिंताजनक असल्याचा दावा खरगेंनी केला. त्याबाबत काही दिवसांपूर्वी त्यांनी निवडणूक नियमांत बदल केल्याचा संदर्भ खरगे यांनी दिला. याखेरीज मतदार याद्यांमधून नावे वगळणे, शेवटच्या टप्प्यात मतटक्का वाढणे किंवा काहींना मतदापासून रोखणे असे काही प्रश्न आहेत. मात्र त्याला समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> ‘ब्रह्मपुत्रा’वर चीनचे महाधरण; तिबेटमधील प्रकल्पाला जिनपिंग सरकारची मंजुरी

राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. आम्ही त्यावर आक्षेप घेतले. देशभर आता निदर्शने सुरू आहेत. मात्र पंतप्रधान चूक मान्य करण्यास तयार नाहीत. शहा यांनी माफी मागणे दूरच, उलट ते त्यांचे समर्थन करत आहेत, अशा शब्दात खरगेंनी पंतप्रधानांना लक्ष्य केले.

‘गांधीजींचा विचार संपवण्याचा प्रयत्न’

महात्मा गांधी हे काँग्रेसचे प्रेरणास्राोत आहेत. मात्र दिल्लीत जे सत्तेत आहेत त्यांच्याकडून हे विचार संपवण्याचा प्रयत्न होतोय. मोदी सरकार तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी केला. सोनिया गांधी अधिवेशनास उपस्थित नसल्याने त्यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला नाही ते आज गांधीजींच्या मारेकऱ्यांचे उदात्तीकरण करत आहेत, अशी टीका सोनियांनी केली.

Story img Loader