पीटीआय, नवी दिल्ली
मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. तेथे शांतता नांदावी यासाठी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. गेल्या १८ महिन्यांपासून मणिपूरमधील नागरिक भयभीत आहेत. तेथील परिस्थिती हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याने नागरिकांचा सरकारवरील विश्वास उडाल्याचा आरोप खरगे यांनी केला आहे.
मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत ३०० हून अधिक जणांचा बळी गेला असून, त्यात महिला, मुलांसह बालकांचाही समावेश आहे. तेथील ढासळत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेमुळे सुमारे एक लाखांवर लोक विस्थापित झाले आहेत. नागरिकांच्या यातना अद्याप कमी झाल्या नसल्याचे खरगे यांनी पत्रात नमूद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट देण्यास नकार देणे समजण्यापलीकडे असल्याचेही खरगे यांनी आपल्या दोन पानी पत्रात म्हटले आहे. अलीकडेच काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांच्यासह मणिपूर काँग्रेसचे प्रमुख के. मेघचंद्र सिंग, काँग्रेस राज्य प्रभारी गिरीश चोडणकर, मणिपूरचे खासदार ए. बिमोल अकोइजाम आणि अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी खरगे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली होती.
हेही वाचा : Manipur : भाजपाला मोठा धक्का; कॉनराड संगमा यांच्या ‘एनपीपी’ने मणिपूर सरकारचा पाठिंबा काढला
राज्यघटनेच्या संरक्षक या नात्याने तुम्ही घटनात्मक औचित्य अबाधित राखणे आणि संविधानात नमूद केल्याप्रमाणे मणिपूरमधील नागरिकांचे व तेथील मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करणे घटनात्मकदृष्ट्या अत्यावश्यक झाले आहे. मला विश्वास आहे की, तुमच्या कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे, मणिपूरचे नागरिक पुन्हा सन्मानाने, सुरक्षिततेने त्यांच्या घरात शांततेत राहतील.
मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस अध्यक्ष
मुख्यमंत्र्यांनी पायउतार व्हावे : इरोम शर्मिला
कोलकाता : मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट हस्तक्षेप आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी व्यक्त केले आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पायउतार व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली. मणिपूरमध्ये सार्वमत घेण्याचे आवाहनही शर्मिला यांनी केंद्र सरकारला केले आहे.
© The Indian Express (P) Ltd