नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याकडे झारखंड मुक्ती मोर्चा व जनता दल (ध) या दोन्ही पक्षांचा कल असल्याने विरोधकांची बाजू अधिक कमकुवत झाली आहे. तरीही या विरोधी पक्षांचे मन वळवण्याचाही प्रयत्न केला जात आहेत.
विरोधी पक्षांचे सर्वसंमत उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आतापर्यंत केरळ, तामीळनाडू, छत्तीसगढ, तेलंगणा आणि कर्नाटक या पाच राज्यांचा दौरा केला आहे. या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी नेत्यांची बैठक झाली. यामध्ये काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, माकपचे महासचिव सीताराम येचुरी, भाकपचे भालचंद्र कानगो, सुधींद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) व जनता दल (धर्मनिरपेक्ष) या दोन विरोधी पक्षांच्या दोलायमान भूमिकेवर चर्चा करण्यात आली. भाजपच्या उमेदवार मुर्मू आदिवासी असून झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल होत्या. शिवाय झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कुटुंबाशी मुर्मू यांचे सलोख्याचे संबंध असल्याने ‘झामुमो’ मुर्मूच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते खरगे यांनी हेमंत सोरेन यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे.
जनता दलाचे (ध) प्रमुख देवेगौडा यांनी यशवंत सिन्हा यांना पािठबा दिला होता, पण आता या पक्षाकडून मुर्मूना मतदान केले जाण्याची शक्यता मानली जात आहे. काँग्रेसमध्येही मुर्मूना मतदान करण्यासंदर्भातील सूर उमटले होते. मात्र काँग्रेसने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रपती पदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल.
यशवंत सिन्हा १७ जुलैला मुंबईत
विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात १७ जुलै रोजी मुंबईला भेट देतील. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ११ वाजता यशवंत सिन्हांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठकही होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा भंग झाली असली तरी, यशवंत सिन्हा ९ जुलै रोजी या केंद्रशासित प्रदेशाचा दौरा करणार आहेत.