Who is Neeraj Shekhar : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३१ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या सहव्या दिवशी आज (बुधवार) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांचा सभागृहात संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. संसदेत भाषण करताना ते भारतीय जनता पक्षाच्या खासदारावर इतके संतापले की, त्यांनी भाजपा खासदाराला त्यांच्या वडिलांची आठवण करून दिली. यानंतर सभागृहात बराच गोंधळ झाला.
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरत्या मूल्याबद्दल मल्लिकार्जुन खरगे सभागृहात बोलत होते. त्यादरम्यान, भाजपा खासदार नीरज शेखर यांनी व्यत्यय आणला. यामुळे संतापलेल्या खरगे यांनी त्यांना शांत बसण्यास सांगितले. विशेष म्हणजे नीरज हे भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र आहेत. चंद्रशेखर देशातील महान समाजवादी नेत्यांपैकी एक होते. ऑक्टोबर १९९० ते जून १९९१ असे ६ महिने ते देशाचे पंतप्रधान होते.
मी तुझ्या बापाचा…
राज्यसभेत खासदार नीरज शेखर यांच्यावर संताप व्यक्त करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मी तुझ्या बापाचाही चांगला मित्र होतो. तू काय सांगतो? मी तुला कित्येक वेळा फिरायला घेऊन गेलो आहे. गप्प बस, गप्प बस.” खरगे पुढे म्हणाले की, त्यांना आणि दिवंगत माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांना एकत्र अटक करण्यात आली होती. त्यांनी स्पष्ट केले की, “म्हणूनच मी म्हणालो की तुझा बाप आणि मी मित्र होतो.”
राज्यसभेत गोंधळ
मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही शात राहण्याचे आवाहन केले. यावेळी सभापतींनी खरगे यांना त्यांच्या भाषणातील माजी पंतप्रधानांबद्दलचा उल्लेख मागे घेण्याची विनंती केली.
सभापतींनी शब्द मागे घेण्याची विनंती केल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “कोणाचाही अपमान करणे माझी सवय नाही.” याशिवाय, खरगे यांनी महाकुभमेळ्यातील चेंगराचेंगरीत हजारो लोकांचा बळी गेला आणि सरकारने मृतांची खरी संख्या उघड करावी, असा आरोप केला.
कोण आहेत नीरज शेखर?
नीरज शेखर हे भारतीय जनता पक्षाचे एक भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते समाजवादी पक्षाकडून २ वेळा लोकसभेचे खासदार होते आणि एकदा राज्यसभेचे खासदार होते. २०१९ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि पुन्हा एकदा राज्यसभेचे खासदार झाले. विशेष म्हणजे नीरज हे भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र आहेत. चंद्रशेखर ऑक्टोबर १९९० ते जून १९९१ असे ६ महिने ते देशाचे पंतप्रधान होते.