काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खासदार शशी थरूर यांचा पराभव केला होता. त्यामुळे सुमारे अडीच दशकानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, आज त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. पक्षाला एकजूट ठेवण्याचे सर्वात मोठे आव्हान खरगे यांच्या पुढे असणार आहे.
हेही वाचा – भारत जोडो यात्रेची नांदेडमध्ये लगबग
मधुसूदन मिस्त्रींनी दिले निवडणूक प्रमाणपत्र
दरम्यान, तत्पूर्वी काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी मल्लिकार्जून खरगे यांना निवडणूक प्रमाणपत्र दिले. तसेच या निवडणुकीमुळे काँग्रेसमध्ये लोकशाही असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रियाही मधुसूदन मिस्त्री यांनी दिली. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही उपस्थित होत्या.
हेही वाचा – “नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा,” केजरीवालांची पंतप्रधान मोदींकडे मागणी, सांगितलं कारण
“हा क्षण माझ्यासाठी भावूक”
काँग्रेस अध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर भाषण करताना हा क्षण भावूक असल्याची भावना मल्लिकार्जून खरगे यांनी व्यक्त केली. तसेच “एका सामान्य कुटुंबातील मुलाला काँग्रेस अध्यक्ष होण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे”, असेही ते म्हणाले.
सोनिया गांधींनी दिल्या शुभेच्छा
काँग्रेस अध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही खरगे यांना शुभेच्छा दिल्या. “मी खरगे यांचे मनापासून अभिनंदन करते. ते एक अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभावचा काँग्रेस पक्षाला नक्कीच फायदा होईल. कार्यकर्त्यापासून ते अध्यक्षपदाचा प्रवास त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्व केला आहे. मी पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देते”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – ‘भारत जोडो यात्रे’चा कर्नाटकात सकारात्मक परिणाम, दिग्गज नेत्यांचं मनोमिलन; काँग्रेस कात टाकणार?
खरगेंसमोर ‘ही’ असतील आव्हाने
सध्याच्या राजकीय स्थितीत आपण गांधी कुटुंबाकडून नियंत्रित केले जात नाहीत, असा स्पष्ट संदेश खरगे यांना देशभरात पोहोचवावा लागेल. यासाठी यांना खरगे यांना विशेष प्रयत्न करावे लागतील. याच बरोबर पक्षातील मतभेद मिटवून विरोधकांमध्ये एकजूट निर्माण करणे आणि पक्षाअंतर्गत संघटनात्मक सुधारणा करणे, ही मोठी आव्हाने खरगे यांच्यासमोर असणार आहेत.