Parliament Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (दि.३ फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाकुंभमेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप झाले. राज्यसभेच्या सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतरच विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत सभागृहात चर्चेची मागणी करण्यात आली होती. मात्र, विरोधी खासदारांची ही मागणी मान्य न केल्यामुळे खासदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्याचंही पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील सभागृहात बोलताना विविध मुद्यांवरून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मल्लिकार्जुन खरगे यांनी महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीबाबत आपलं म्हणणं मांडत असताना चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृत्यूंच्या आकडेवारीबाबत शंका उपस्थित केली. यावरून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात शा‍ब्दिक चकमकही झाल्याचं पाहायला मिळालं. “महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला? या घटनेतील सत्य आकडेवारी समोर येत नाही”, असं म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला जाब विचारला.

मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले?

राज्यसभेत बोलातना मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं की, “महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. पण हे चुकीचे असेल तर मला सत्य सांगा. या घटनेतील मृतांच्या आकडेवारीबाबत सत्य काय आहे ते सांगा. या घटनेत अखेर किती जणांचा मृत्यू झाला? यात सत्य काय आहे? एवढी तरी माहिती तरी द्या, माझी चूक असेल तर मी माफी मागतो”, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं. यानंतर सभापती जगदीप धनखर यांनीही मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिलं.

‘सरकार फक्त खोटी आश्वासने देण्याचं काम करतंय’

“केंद्र सरकारने अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांना काय दिलं? सरकार फक्त खोटी आश्वासने देण्याचं काम करत आहे. मात्र, खोटी आश्वासने देण्यापेक्षा काम करावं. गंगेत डुबकी मारल्याने गरीबी दूर होत नाही आणि पोटही भरत नाही. त्यामुळे गरिबांना पोट भरण्यासाठी अन्न देणं गरजेचं आहे. गेल्या १० वर्षांत देशभरात एक लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मग याला जबाबदार कोण आहे? मग त्या गरिबांचा विकास हा ते मेल्यानंतर होतो का? क्रेडिट लिमीट वाढवल्याने काय होणार? उलट कर्ज वाढेल. मग सरकारची काय मदत होईल? सरकारची सबसीडी कुठे आहे? शेतकऱ्यांसाठी एमएसपी कुठे आहे? सर्व गोष्टीवर टॅक्स लावला जातो आणि म्हणतात की शेतकऱ्यांचं सरकार आहे. खरं तर सरकारला शेतकऱ्यांचं दु:ख समजत नाही. शेतकऱ्यांचं दु:ख पंतप्रधान नरेंद्र मोदींना समजत नाही”, असं म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallikarjun kharge on mahakumbh stampede rajya sabha parliament budget session in pm modi politics gkt