रेल्वे प्रवास भाडे निश्चिती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी केली खरी, परंतु त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चाट पडण्याची शक्यता जास्त आहे. यापूर्वी प्रवास भाडे रेल्वे मंत्रालय निश्चित करीत असे. आता मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात होणाऱ्या चढउतारांची दखल घेऊन रेल्वे भाडे प्राधिकरण भाडेवाढीचा निर्णय घेईल. भाडे निश्चितीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा करीत खरगे यांनी या प्रक्रियेत पारदर्शकता आणल्याचा दावा केला.
‘कभी चिलमन (पडदा) में वो झाँके..कभी चिलमन में हम झाँके. लगा दो आग चिलमन में..न वो झाँके; न हम झाँके.’ हा शेर ऐकवत ‘हमने चिलमन में आग लगा दी’ अशी भावना खरगे यांनी व्यक्त केली. सध्याच्या रेल्वे भाडे निश्चिती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचेच खरगे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. यापूर्वी प्रवास भाडे निश्चित करण्याची प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे चालत असे. यापुढे या प्रक्रियेचे संचालन स्वतंत्र प्राधिकरणाद्वारे होईल. त्यामुळे रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. दिल्लीत झालेल्या अरुणाचल प्रदेशच्या युवकाच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना अरुणाचलची राजधानी ईटानगरदेखील रेल्वे नकाशात दिसेल. शिलाँगपर्यंत रेल्वे नेण्यात येईल. आपल्या भाषणात खरगे यांनी रेल्वे कर्मचारी भरतीचा कोठेही उल्लेख केला नाही.
वैष्णोदेवी यात्रेसाठी कटरापर्यंत रेल्वे नेण्याची घोषणा त्यांनी केली. मात्र काश्मीर ते लडाख रेल्वेमार्गासंबंधी खरगे यांनी अवाक्षरही काढले नाही. चार वर्षांत सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावाच अर्थसंकल्पात सादर केला गेला. अकराव्या पंचवार्षिक योजनेत निश्चित केलेल्या २ हजार २७ किलोमीटर नवीन, ४ हजार ५५६ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण केल्याचा दावा खरगे यांनी केली.
गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांमध्ये राज्य व केंद्र सरकारच्या आर्थिक भागीदारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. त्यात कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड व हरयाणा या राज्यांचा समावेश आहे.

प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना एसएमएसद्वारे सूचना
प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना त्यांचे आरक्षण निश्चित झाल्याचा एसएमएस आता रेल्वेकडूनच पाठवण्यात येणार आहे. स्थानकाच्या परिसरात रेल्वे गाडय़ांच्या प्रत्यक्ष वेळांची माहिती देणारी यंत्रणा बसवण्याचेही अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले. याशिवाय ठराविक स्थानकांतील प्रवासादरम्यान जेवणाचे ‘ऑनलाइन बुकिंग’ करणे, पैसे जमा केल्यानंतर तिकिटे देणारी यंत्रणे, मोबाइल फोनद्वारे तिकीट आरक्षण या सुविधाही सुरू करण्यात येतील.

दुर्घटना रोखण्यासाठी..
– एकही मानवविरहित रेल्वे क्रॉसिंग नाही. रस्त्यावरील वाहनांना रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी गाडी येत असल्याची पूर्वसूचना देणारी ध्वनिचित्रयंत्रणा बसवणार.
– रेल्वे गाडय़ांची टक्कर टाळण्यासाठी स्वदेशी बनावटीची यंत्रणा राबवणार. मोठा आघात, अपघात सहन करणारे डबे विकसित करणार
– रेल्वेतील आगीच्या घटना टाळण्यासाठी आगप्रतिबंधक साहित्याचा वापर, विद्युत यंत्रणेसाठी बहुस्तरीय संरक्षण, डब्यांमध्ये वहनीय अग्निशमन यंत्रे, पॅण्ट्रीमध्ये स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरऐवजी इंडक्शनवर आधारित यंत्रणेचा वापर.

१७ प्रीमियम वातानुकूलित गाडय़ा
नाताळ आणि नववर्षांच्या सुट्टय़ांदरम्यान होणाऱ्या प्रचंड प्रवासी गर्दीवर उपाय म्हणून सुरू करण्यात आलेल्या दिल्ली-मुंबई मार्गावरील ‘प्रीमियम’ वातानुकूलित विशेष रेल्वेगाडीला मिळालेला प्रतिसाद पाहून अतिवर्दळीच्या मार्गावर अशा १७ गाडय़ा सुरू करण्याची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
दिल्ली-मुंबई या मार्गावर चालवण्यात आलेल्या या विशेष गाडीसाठी रेल्वेने ‘गतिबोधक दर’ (डायनामिक फेअर) प्रणाली राबवली आहे. त्याअंतर्गत तिकिटांचे दर प्रत्येक दिवशी वाढत जातात. या प्रणालीमुळे रेल्वेचे उत्पन्न मुंबई-दिल्ली राजधानी गाडीच्या तुलनेत ४८ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे आता अशा १७ विशेष गाडय़ा चालवण्यात येणार आहेत.
या गाडय़ा खालील मार्गावर ठराविक हंगामात आठवडय़ातून एकदा वा दोनदा चालवण्यात येतील :
हावडा-पुणे (आठवडय़ातून दोनदा), मुंबई-हावडा (आठवडय़ातून दोनदा), मुंबई-पाटणा (आठवडय़ातून दोनदा), वांद्रे-अमृतसर (कोटा, नवी दिल्ली मार्गे आठवडय़ातून एकदा), वांद्रे-कटरा (आठवडय़ातून एकदा), कटरा-हावडा, मुंबई-गोरखपूर (आठवडय़ातून दोनदा), पाटणा-बंगळुरू, यशवंतपूर-कटरा, तिरुवनंतपुरम-बंगळुरू, कामाख्या-नवी दिल्ली, कामाख्या-चेन्नई,
निजामुद्दीन-मडगाव, सियालदाह-जोधपूर, यशवंतपूर-जयपूर, अहमदाबाद-दिल्ली सराय रोहिल्ला, गोरखपूर-नवी दिल्ली.   

३९ नव्या एक्स्प्रेस गाडय़ा
यापैकी महाराष्ट्रातून नांदेड-औरंगाबाद  एक्स्प्रेस(आठवडय़ात एकदा), औरंगाबाद-रेणिगुंटा, वांद्रे-लखनऊ जंक्शन, भावनगर-वांद्रे, गोरखपूर-पुणे, हुबळी-मुंबई, कानपूर-वांद्रे, मुंबई-चेन्नई, मुंबई-गोरखपूर, मुंबई-करमाली, नागपूर-रीवा, पुणे-लखनऊ या एक्स्प्रेस गाडय़ा ये-जा करतील.

उद्योग क्षेत्राकडून स्वागत
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अंतरिम रेल्वे अर्थसंकल्पाचे उद्योग जगताकडून स्वागत करण्यात आले. कोणतीही प्रवासी भाडेवाढ न करता सरकारने अर्थसंकल्पात रेल्वेच्या आधुनिकीकरणावर आणि विस्तारावर भर दिला आहे, असा कौतुकाचा वर्षांव उद्योजकांनी रेल्वे अर्थसंकल्पावर केला आहे.‘‘केवळ जनतेला खूश करण्यासाठीचे निर्णय या रेल्वे अर्थसंकल्पात घेण्यात आलेले नाहीत. जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊन गुंतवणूक, आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण यावर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. रेल्वे क्षेत्राकडेही थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ कसा येईल, याकडेही लक्ष देण्यात आलेले आहे,’’ असे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद जयपुरिया यांनी सांगितले. ‘‘रेल्वेतील खासगी सहभाग वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. भविष्यातील विकासमार्गाच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलले आहे,’’ असे असोचामचे अध्यक्ष राणा कपूर यांनी सांगितले.

ईशान्येकडील राज्यांसाठी दोन महत्त्वाच्या गाडय़ा
ईशान्येकडील राज्यांसाठी मीटरगेजऐवजी ब्रॉडगेज आणि दीर्घ पल्ल्याच्या दोन नव्या गाडय़ांची घोषणा रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी आपल्या अंतरिम अर्थसंकल्पात केली. मात्र भाजप आणि एजीपीने या विरोधी पक्षांनी सदर घोषणा नैराश्यजनक असल्यीच टीका केली.
आगामी आर्थिक वर्षांत कामाख्य-नवी दिल्ली वातानुकूलित एक्स्प्रेस (साप्ताहिक) छप्रा आणि वाराणसीमार्गे आणि कामाख्य-चेन्नई वातानुकूलित एक्स्प्रेस (साप्ताहिक) मालदा आणि हावडामार्गे या दोन गाडय़ा सुरू करण्याची घोषणा खरगे यांनी केली.
त्याचप्रमाणे देकरगाव (आसाममधील तेजपूर) ते नहारलागून (इटानगर) प्रवासी गाडी (दररोज) नव्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या पुढाकारातून या आर्थिक वर्षांत रांगिया-मुरकोंगसेलेक हा ५१० कि.मी. लांबीचा मीटरगेज मार्ग ब्रॉडगेज करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सदर मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर संरक्षण दलास जवानांची आणि यंत्रसामुग्रीची अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर ने-आण करणे सुलभ होणार आहे. इटानगर आणि मेघघालयही लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे, असेही ते म्हणाले.

‘रेल्वे प्रवासी भाडे प्राधिकरणा’ची स्थापना
प्रवासी भाडय़ांसंदर्भातील निर्णय पारदर्शक प्रक्रियेद्वारे घेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ‘रेल्वे प्रवासी भाडे प्राधिकरणा’ची (आरटीए) स्थापना केली आहे, असे रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी रेल्वे अर्थसंकल्प मांडताना सांगितले. प्रवासी भाडय़ाचा निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकार या प्राधिकरणाशी सल्लामसलत करेल, असे खरगे यांनी सांगितले. रेल्वेच्या गरजा काय आहे, याचाच विचार हे प्राधिकरण करणार नाही, तर प्रवासी भाडेवाढीचा रेल्वे आणि प्रवासी यांना फायदा कसा होईल, हे पाहिले जाईल. प्रवासी भाडेवाढ या प्राधिकरणाद्वारे पारदर्शक पद्धतीने करता येईल, असे खरगे यांनी सांगितले. प्रवासी भाडे रचनेत सुसूत्रीकरण आणण्यात हे प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावेल. प्रवासी भाडे आणि वाहतूक यांच्यातील गुणोत्तर सुधारण्यासाठी हे प्राधिकरण प्रयत्न करेल. त्याचबरोबर रेल्वेच्या छुप्या दरवाढीला या प्राधिकरणामुळे आळा बसेल, असे खरगे यांनी सांगितले.

रेल्वे अर्थसंकल्पाची वैशिष्टय़े
* प्रवासी, माल वाहतुकीचे दर ‘जैसे थे’
* दिल्ली-आगरा, दिल्ली-चंडीगढ मार्गावर ताशी १६० ते २०० किमी वेगाने धावणाऱ्या उपजलद गाडय़ा.
* सामान वाहतूक करण्याच्या क्षेत्रात शिरकाव करण्यासाठी देशभरात दुधाची वाहतूक करणाऱ्या विशेष गाडय़ा चालवण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
* ११व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत २२०७ किमीच्या नव्या मार्गाची उभारणी.
* पूर्व व पश्चिम मार्गावर मालवाहतुकीसाठी विशेष मार्ग.
* काश्मीरमधील प्रवासी वाहतुकीसाठी अतिथंड वातावरणापासून संरक्षण करणारे विशेष डबे.
* रेल्वे ऊर्जा व्यवस्थापन कंपनी कार्यान्वित. सौरऊर्जा प्रकल्प आणि पवनचक्क्या उभारण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून ४० टक्के अनुदान.
*  रेल्वे स्थानकांत आणखी जन आहार केंद्रे आणि सरकते जिने बसवणार.
* रेल्वेगाडय़ांमध्ये पुढील स्थानकाचे नाव व वेळ दाखवणारी यंत्रणा
* एसी चेअर आणि एक्झिक्युटिव्ह चेअर डब्यांतील प्रवाशांनाही उन्नतीकरण योजनेचा लाभ मिळणार.
* रेल्वेतील पायाभूत सुविधांसाठी थेट परकीय गुंतवणुकीस चालना.
* १९ नव्या रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण; ५ मार्गाचे दुहेरीकरण.
*  ‘बायो टॉयलेट’ आणखी गाडय़ांमध्ये बसवणार.