यूपीएच्या १० वर्षाच्या शासनकाळात १२ एअर स्ट्राइक केले मात्र, आम्ही कधी याचे राजकारण केले नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. हुबळी विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते. शनिवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाच वर्षांच्या कालावधीत तीन एअर स्ट्राइक केल्याचा दावा केला होता. त्यानंतर खर्गे यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे आता एअर स्ट्राईकवरून चांगलेच राजकारण तापल्याचे चित्र दिसत आहे.
एनडीए सरकारकडून शहिदांच्या मृतदेहांचे राजकारण करण्यात येत आहे. पंतप्रधानांकडे विकासावर सांगण्यासारखे काहीच नाही, त्यामुळे शहिदांच्या मृतदेहांचे राजकरण करण्यात येत आहे, असे मत खर्गे यांनी व्यक्त केले आहे. हावेरीमध्ये पक्षाच्या रॅलीला संबोधित केल्यानंतर हुबळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
२०१४ च्या निवडणुकीत १० कोटी नोकऱ्यांचे आश्वासन देणाऱ्या भाजपाच्या काळात गेल्या चार नोकऱ्यांची कपात झाली आहे. नव्या नोकऱ्या निर्मिती झाली नाही. एनएसएसओच्या अहवालानुसार, देशभरात तब्बल ३८ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. तर २७ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या. १० कोटी नोकऱ्यांचे आमिष दाखवणाऱ्या भाजपाने आपल्या आश्वासनाचे काय केले? असा सवाल मल्लिकार्जून खर्गे यांनी केला.
राजनाथ सिंह काय म्हणाले होते –
मागच्या पाचवर्षात तीन वेळा आपण सीमा ओलांडली व आपल्या सैन्य दलांनी यशस्वी एअर स्ट्राइक केला. मी तु्म्हाला दोन स्ट्राइकची माहिती देईन. तिसऱ्याबद्दल काही सांगणार नाही असे राजनाथ म्हणाले. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर २०१६ मध्ये भारतीय सैन्याने केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि बालकोटमधल्या एअर स्ट्राइकचा दाखला त्यांनी दिला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानातील बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदचा तळ एअर स्ट्राइकमध्ये उद्धवस्त केला. त्याआधी उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे लाँच पॅड उद्धवस्त केले. एअर स्ट्राइकच्या तिसऱ्या घटनेबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही असे राजनाथ यांनी सांगताच जमलेल्या गर्दीने टाळयांचा कडकडाट केला.