नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये ‘जी-२३’ नावाचा कोणताही बंडखोर गट राहिलेला नाही. माझा उमेदवारी अर्ज भरताना बंडखोर गटातील नेतेही उपस्थित होते. मी कोणाला विरोध करण्यासाठी नव्हे तर, काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. मी सगळय़ांना बरोबर घेऊन संघ आणि भाजपविरोधात संघर्ष करेन, असे काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
खरगेंचे निवडणुकीतील विरोधक शशी थरूर यांनी नागपूरमधून प्रचार सुरू केला आहे. खरगे हे ७ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ‘मी थरूर यांना फोन करून सहमतीने पक्षाध्यक्ष ठरवू अशी विनंती केली होती पण, लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. थरूर यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. थरूर माझे शत्रू नव्हे तर, लहान बंधू आहेत. निवडणुकीनंतर आम्ही एकत्र पक्षासाठी काम करू’, असे खरगे म्हणाले.
पूर्णवेळ काम करेन!
राजकारण म्हणजे अर्धवेळ केलेली नोकरी नव्हे, त्यासाठी २४ तास द्यावे लागतात. मी पक्षाध्यक्ष झालो तर, मीही पूर्णवेळ पक्षासाठी देईन. लोकसभेत गटनेता असताना तसेच, राज्यसभेत विरोधीपक्षनेता म्हणून संध्याकाळपर्यंत संसदेत असायचो, असे सांगून खरगे म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर खरगे आपल्याला मार्गदर्शन करायला लोकसभेत असतील की नाही, असे मला (मोदींकडून) ऐकवले गेले. लक्ष्य बनवून माझा पराभव केला गेला. पण, आता पक्षाध्यक्ष होऊन पुन्हा एकदा संघ आणि भाजपविरोधात लढण्याची संधी मला मिळू शकेल!
सर्वसंमतीने पक्षात बदल करू
मला आधी पक्षाध्यक्ष तरी होऊ द्या, मग संघटना कशी मजबूत करायची ते ठरवू. सर्वाना एकत्र घेऊन पक्ष नेते-कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाईल. संघटनेमध्ये कोणते बदल करायला हवेत, यासाठी समिती नेमली जाईल. मग निर्णय घेऊ, असे खरगे म्हणाले. मी गांधी कुटुंबाचा अधिकृत वा अनधिकृत उमेदवार आहे, असे म्हणणे योग्य नाही. पक्षाध्यक्षपदाची निवडणूक मुक्तपणे आणि निष्पक्ष व्हावी, यासाठी गौरव वल्लभ, दीपेंद्र हुडा आणि सैय्यद नासीर हुसेन यांनी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असल्याचे खरगे यांनी सांगितले. हे तिघेही खरगे यांचा प्रचार करणार आहेत. उदयपूर चिंतन शिबिरामध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ असा निर्णय घेतला असल्याने मी राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहितीही खरगे यांनी दिली. गांधी कुटुंबाने मोठा त्याग केलेला आहे. सोनियांनी पक्षाध्यक्ष झाल्यानंतर पक्ष मजबूत केला, केंद्रात दहा वर्षे सरकार टिकले. त्यामुळे गांधी कुटुंबाचा मी सल्ला घेईन. ते योग्य असतील तर त्याची अंमलबजावणी होईल, असेही खरगे म्हणाले.