Mallikarjun Kharge Vs Jagdeep Dhankhar : संसदेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील गोंधळ आजही सुरूच राहिल्याचे पाहायला मिळाले. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात ‘इंडिया’ आघाडीने अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. यानंतर आज (शुक्रवार) राज्यसभेचे विरोधी पक्षनते मल्लिकार्जुन खरगे आणि जगदीप धनखड यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर राज्यसभेचे कामकाज आजच्या दिवासाठी तहकूब करण्यात आले.
अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावर बोलताना धनखड यांनी मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि विरोधकांच्या आरोपांमुळे आपण खचून जाणार नाही असे सुनावले. धनखड म्हणाले की, “मी एका शेतकर्याचा मुलगा आहे. मी खचून जाणार नाही. मी देशासाठी माझ्या प्राणांची आहुती देईन. तुम्हाला (विरोधकांना) २४ तास एकच काम आहे, शेतकऱ्याचा मुलगा इथे का बसला आहे? मी खूप सहन केले… तुम्हाला प्रस्ताव आणण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही संविधानाचा अपमान करत आहात”.
धनकड यांचा जन्म १९५१ मध्ये राजस्थानच्या झुणझुणू येथील कैथरना गावात झाला आहे. विरोधकांनी अविश्वास ठराव आणल्यानंतर भाजपाकडून हा जाट समुदायाचा आणि गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या एका शेतकरी पुत्राचा अपमान करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान धनखड यांच्या या आरोपांना मल्लीकार्जुन खरगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी राज्यसभा सभापती काँग्रेस नेत्यांचा अपमान करत आहेत आणि ते भाजपाच्या खासदारांना विरोधकांना लक्ष करण्याची संधी देत असल्याचा आरोप धनकड यांच्यावर केला.
“तुम्ही सदस्यांना (भाजप) इतर पक्षांच्या सदस्यांविरूद्ध बोलण्यासाठी प्रोत्साहित करत आहात… मी देखील एका मजूराचा मुलगा आहे. मी तुमच्यापेक्षा कठीण काळ पाहीला आहे… तुम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांचा अपमान करत आहात, तुम्ही काँग्रेसचा अपमान करत आहत… आम्ही येथे तुमचे गुणगान ऐकण्यासाठी आलेलो नाहीत, आम्ही येथे चर्चेसाठी आलो आहोत”, असे खरगे म्हणाले.
हेही वाचा>> Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य; “युक्रेनचं युद्ध मोदींनी जसं एका फोनवर थांबवलं तसं बांगलादेशात…
दरम्यान धनखड यांचे पक्षपाती वर्तन घटनाविरोधी आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या ६० हून अधिक सदस्यांनी धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या नोटिशीवर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट, द्रमुक, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा आदी ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांचा समावेश आहे.