नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिस्पर्धी शशी थरूर यांचा पराभव करून एकतर्फी विजय मिळवला. या निवडणुकीमुळे खरगे यांच्या रुपाने काँग्रेसला अडीच दशकांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभला आहे.
काँग्रेस मुख्यालयात बुधवारी सकाळी मतमोजणी झाली. खरगे यांना ७,८९७, तर थरूर यांना १,०७२ मते मिळाली. ४१६ मते अवैध ठरली, असे काँग्रेसच्या निवडणूक विभागाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
थरूर यांच्या गटाने उत्तर प्रदेश, पंजाब आणि तेलंगणमधील मतदान प्रक्रियेबाबत आक्षेप घेत तक्रारी केल्या. ‘‘या तक्रारींत तथ्य नाही. यासंदर्भातील पत्रातील प्रत्येक मुद्दय़ाला उत्तर दिले जाईल. मात्र, हे पत्र माध्यमांत प्रसृत न करत थेट पक्षाच्या निवडणूक विभागाला द्यायला हवे होते’’, असेही मिस्त्री म्हणाले.
खरगे यांनी मतमोजणीनंतर पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस बळकटीकरणावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. खरगे हे २६ ऑक्टोबरला अधिकृतपणे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.
देशभरात काँग्रेसची पडझड होत असताना ‘भारत जोडो’ यात्रेने पक्षात नवचैतन्य आणल्याचे चित्र आहे. आता पक्षाला गतवैभव मिळवून देण्याचे मोठे आव्हान खरगे यांच्यासमोर असेल. हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुका ही त्यांची पहिली परीक्षा असेल. तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभला आहे. घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या भाजपसह विरोधकांना काँग्रेसने या निवडणुकीद्वारे उत्तर दिल्याचे मानले जाते.
या निकालाच्या अधिकृत घोषणेआधीच थरूर यांनी आपला पराभव स्वीकारून खरगे यांचे अभिनंदन केले. ‘‘खरगे यांना निर्णायक कौल मिळाला. काँग्रेस अध्यक्षपदी निवड हा मोठा सन्मान असून, हे मोठय़ा जबाबदारीचे काम आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो’’, अशी प्रतिक्रिया थरूर यांनी दिली.
‘‘पक्षाच्या प्रतिनिधींचा निर्णय अंतिम असतो आणि मी तो नम्रपणे स्वीकारतो. आपल्या कार्यकर्त्यांना अध्यक्ष निवडण्याची मुभा देणाऱ्या पक्षाचा सदस्य होणे हाच विशेष सन्मान आहे. आमचे नवे अध्यक्ष हे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनानुसार आम्ही सर्वजण एकजुटीने पक्षाला नक्कीच नव्या उंचीवर नेऊ. पक्षाला सुमारे २५ वर्षे समर्थ नेतृत्व देऊन निर्णायक क्षणी योग्य मार्गदर्शन आणि निर्णय घेणाऱ्या मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधींचे ऋण कधीही फेडता येणार नाहीत. त्यांचे निर्णय, नवे दिशादर्शन, दूरदृष्टी आगामी काळातही नव्या नेतृत्वाला मार्गदर्शन व प्रेरणा देत राहील. नेहरू-गांधी कुटंबाचे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हृदयात अढळ स्थान कायम राहील’’, असे थरूर यांनी निवेदनात नमूद केले. मुक्त व नि:पक्षपाती निवडणूक प्रक्रियेचा आग्रह धरल्याबद्दल थरूर यांनी माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचेही आभार मानले.
थरूर यांना आधीच्या पराभूतांपेक्षा अधिक मते
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थरूर यांचा पराभव झाला असला तरी गेल्या दोन निवडणुकांतील पराभूत उमेदवारांपेक्षा थरूर यांना अधिक मते मिळाली आहेत. थरूर यांना १,०७२ मते मिळाली आहेत. सन २००० मध्ये सोनिया गांधींचे (७,४४८) प्रतिस्पर्धी जितेंद्र प्रसाद यांना केवळ ९४ मते मिळाली होती. तत्पूर्वी, १९९७ च्या निवडणुकीत सीताराम केसरी (६,२२४) यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार यांना ८८२ आणि राजेश पायलट यांना ३५४ मते मिळाली होती.
पक्षात कोणी छोटा किंवा मोठा नाही. सर्वाना कार्यकर्ता म्हणून एकजुटीने काम करावे लागेल. लोकशाही आणि घटनेवर हल्ला करणाऱ्या शक्तींशी आपल्याला लढायचे आहे.
–मल्लिकार्जुन खरगे, नवनिर्वाचित अध्यक्ष, काँग्रेस