पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये नंदीग्राममधून पराभव झाला. त्यांच्याविरुद्ध त्यांच्याच पक्षातले एकेकाळचे विश्वासू नेते सुवेंदू अधिकारी यांचा भाजपाच्या तिकिटावर विजय झाला. मात्र, हा पराभव ममता बॅनर्जी यांना अमान्य आहे. याबद्दल २ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर ३ मे रोजी त्यांनी भाजपावर गैरव्यवहार केल्याचे आरोप देखील केले होते. एकीकडे नंदीग्राममधून पराभूत झाल्यानंतर ममता बॅनर्जी कोणत्या मतदारसंघातून निवडून विधानसभेत जाणार, याची चर्चा सुरू असताना खुद्द ममता बॅनर्जी यांनी मात्र नंदीग्राममधूनच विधानसभेत जाण्याचा चंग बांधला आहे.

नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं ऐतिहासिक विजय मिळवत ममतादीदींना तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर बसवलं. मात्र, असं करताना खुद्द ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. फक्त एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवल्यामुळे ममता बॅनर्जी यांना विधानसभेत निवडून जाण्यासाठी दुसरा मतदारसंघ शोधण्याची वेळ आली. मात्र, नंदीग्राममध्ये मतमोजणीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी थेट कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 

२ मे रोजी नेमकं झालं काय?

२ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर एकीकडे संपूर्ण राज्यातून तृणमूलचे उमेदवार विजयी झाल्याचं वृत्त येत असताना नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याचं वृत्त आलं. वास्तविक काही वेळ आधीच त्यांचा विजय झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या काही वेळातच पुन्हा त्यात बदल करून त्या पराभूत झाल्याचं जाहीर करण्यात आलं. यासंदर्भात दुसऱ्या दिवशी ३ मे रोजी ममता बॅनर्जी यांनी स्थानिक निवडणूक अधिकारी पुनर्मोजणीसाठी तयार नसल्याचं सांगितलं. भाजपाकडून निवडणूक अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळेच त्यांनी पुनर्मोजणीला नकार दिल्याचा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. आता तेव्हा जाहीर केल्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी कोलकाता उच्च न्यायलयात याचिका दाखल केली असून त्यावर २४ जून रोजी सुनावणी होणार आहे.

Nandigram Result : म्हणून नंदीग्रामच्या निकालाकडे फक्त बंगालच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष!

प्रतिष्ठेचं नंदीग्राम!

ममता बॅनर्जी यांनी यावेळी आपला हक्काचा भोवानीपूर मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षातले त्यांचे एकेकाळचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी मतभेदांनंतर भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते अधिकारी नंदीग्राममधून निवडणुकीसाठी उभे होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. ममता बॅनर्जी यांनी एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवल्यामुळे आणि त्यात त्यांचा पराभव झाल्यामुळे त्यांच्यासाठी दुसऱ्या मतदारसंघाचा शोध सुरू झाला. मात्र, नंदीग्रामसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधूनच विधानसभेत जाण्याचा चंग बांधल्याचं दिसून येत आहे.

Story img Loader