गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डर्टी पॉलिटिक्स खेळल्याचा आरोप पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने केलाय. नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यासाठी कोलकात्यामध्ये सॉल्ट लेक मैदान देण्याची मागणी भाजपने केली होती. मात्र, बॅनर्जी यांनी मैदान देण्यास नकार दिला.
भाजपचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष राहुल सिन्हा म्हणाले, मोदी यांच्या सत्कार करण्यासाठी आम्ही सॉल्ट लेक मैदान उपलब्ध आहे का, याची चौकशी केली. सुरुवातीला आम्ही दिलेल्या तारखांना मैदान उपलब्ध असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. मात्र, नंतर मुख्यमंत्री कार्यालयातून आम्हाल फोन आला. त्यावेळी आम्ही दिलेल्या तारखांना मैदान उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित तारखांसाठी एक वर्षापूर्वीच हे मैदान एका खासगी कंपनीला देण्याचा निर्णय झाला असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यानंतर मी बॅनर्जी यांना पत्र लिहिले. त्यामध्ये एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने दुसऱया राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाचा अवश्य विचार केला पाहिजे, असे सांगून बॅनर्जी यांनी संबंधित खासगी कंपनीला आपल्या कार्यक्रमाच्या ताऱखा बदलण्यास सांगावे, अशी विनंती केली. मात्र, माझ्या मागणीचा बॅनर्जी यांनी अजिबात विचार केला नाही.
भाजपने आता हा कार्यक्रम महाजाती सदन येथे घेण्याचे ठरविले आहे. आपली मुस्लिम व्होट बॅंक सांभाळण्यासाठीच बॅनर्जी यांनी मोदी यांच्या कार्यक्रमासाठी जागा दिली नाही का, असे विचारल्यावर सिन्हा म्हणाले, मला तरी तसे वाटत नाही. मात्र, अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या राज्यात कोणताही कार्यक्रम करायचाच नाही, असा बॅनर्जी याचा स्वभाव आहे. त्यामुळेच त्या कोणत्याच राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना आवश्यक सुविधा देत नाहीत.
‘नरेंद्र मोदींविरोधात ममता बॅनर्जींचे ‘डर्टी पॉलिटिक्स”
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डर्टी पॉलिटिक्स खेळल्याचा आरोप पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने केलाय.

First published on: 03-04-2013 at 11:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee bans narendra modi from salt lake stadium