पीटीआय, सप्तग्राम

पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी विनयभंगाचे आरोप झाल्यानंतरही राजीनामा का दिला नाही असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी विचारला. राजीनामा का देत नाही याचे राज्यपालांनी स्पष्टीकरण दिलेच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.हुगळी येथे एका प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना लक्ष्य केले. जोपर्यंत बोस आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आपण राजभवनात पाऊल ठेवणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, ‘‘राज्यपाल म्हणतात की ‘दीदीगिरी’ सहन करणार नाही, पण मी म्हणते राज्यपाल, यापुढे तुमची ‘दादागिरी’ चालणार नाही. राज्यपाल, मला हे सांगा की माझा दोष काय होता.

तुम्ही स्वत:ला कोण समजता? तुम्ही महिलांचा छळ का करता?’’ राज्यपालांविरोधात अशा प्रकारचे आरोप केले जात असतील तर त्यांनी राजीनामा का देऊ नये याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी बॅनर्जी यांनी केली.राजभवनमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका महिलेने गेल्या आठवड्यात असा आरोप केला की, राज्यपाल आनंद बोस यांनी त्यांच्या निवासस्थानी २४ एप्रिल आणि २ मे रोजी आपला विनयभंग केला. बोस यांनी दाखवलेल्या सीसीटीव्ही चित्रफिती संपादित असल्याचा दावा बॅनर्जी यांनी केला.

Story img Loader