इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीत २०२४ च्या पंतप्रधान पदाच्या दावेदाराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला असल्याचे सांगितले गेले. दरम्यान मल्लिकार्जून खरगे यांनी मात्र या प्रस्तावावर बोलताना म्हटले की, इंडिया आघाडीचे लक्ष निवडणूक जिंकण्यावर असले पाहीजे. काँग्रेस नेते पीजे जोसेफ यांनी वेगळीच माहिती दिली. ते म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी खरगे यांचे नाव घेतलेच नव्हते. इंडिया आघाडीने पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा पुढे करावा, असे त्या म्हणाल्या होत्या.
“ममता बॅनर्जी यांनी खरगेंचे नाव सुचविले नाही. पंतप्रधानपदाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, आपण दलित नेता पंतप्रधानपदासाठी पुढे केल्यास चांगले होईल. त्यांनी यावेळी कुणाचेही नाव घेतले नाही. बॅनर्जी यांनी बैठकीच्या शेवटी हा विषय काढल्यामुळे यावर अधिक चर्चा होऊ शकली नाही”, अशी माहिती काँग्रेस नेते जोसेफ यांनी एएनआयशी बोलताना दिली. इंडिया आघाडीच्या बैठकींनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसने या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आताच पंतप्रधान पदाबाबत चर्चा नको, असे सांगून खरगे यांनी या विषयाला बगल दिली.
आधी निवडणूक जिंकूया – खरगे
“सर्वात आधी, आपल्याला ही निवडणूक जिंकावी लागेल. त्यामुळे जिंकण्यासाठी काय काय करावे लागेल, याची चर्चा आता करायला हवी. पंतप्रधान कोण होणार? हे नंतरही ठरवता येईल. जर आपले जास्त खासदार निवडून आले नाहीत, तर पंतप्रधानपदाची चर्चा करून काय उपयोग. पहिल्यांदा आपल्या खासदारांची संख्या वाढवावी लागेल, त्यासोबतच बहुमत आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकण्यावर आपण लक्ष केंद्रीत करू”, अशी भूमिका खरगे यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली.
नितीश कुमार, लालू यादव नाराज?
काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार, खरगे यांनी कधीही दलित ही ओळख घेऊन जातीचे राजकारण केले नाही. त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी समानतेसाठी लढा दिला. त्यामुळेच त्यांनी दलित पंतप्रधान ही कल्पना नाकारली. ते गरिबांसाठी काम करत आहेत आणि त्यांनी कधीही स्वतःची ओळख एखाद्या समाजाचा नेता म्हणून घडवू दिली नाही. दुसरीकडे मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पुढे केल्यामुळे नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव या नेत्यांना फारसे रुचले नसल्याचे बोलले जाते. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेला उपस्थित न राहता बैठकीतून काढता पाय घेतला.
इंडिया आघाडीची दिल्ली येथे चौथी बैठक संपन्न होत असून जागावाटपाच्या चर्चेवर तोडगा काढण्यासंदर्भात सर्वपक्षांचे एकमत झाले आहे. यापुढे जागावाटपाच्या चर्चेला अधिक विलंब न लावत वर्षअखेरीपर्यंत काही राज्यातील जागावाटपावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान उत्तर प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि खरगे यांनी उत्तर प्रदेशमधून लोकसभेची निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. उत्तर प्रदेश राज्य हे राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे राज्य असून राज्यातील रायबरेली आणि अमेठी हे दोन मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जातात. या मतदारसंघातील लोकांशी गांधी परिवाराचे वैयक्तिक संबंध आहेत, असे काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी सांगितले.