गेल्या महिन्याभरापासून देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मोठी चर्चा आहे. त्या निवडणुकांना आता सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये तर सर्वाधिक ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे तामिळनाडू आसाम, पुद्दुचेरी किंवा केरळ या राज्यांपेक्षाही पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी जास्त काळ राहणार आहे. त्या ८ टप्प्यांमधल्या सर्व जागांपैकी आज राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत असलेल्या नंदीग्राम मतदार संघात आज मतदान होणार आहे. आणि त्यांच्यासमोर आव्हान देऊन उभे आहेत त्यांचेच एकेकाळचे विश्वासू सहकारी सुवेंदू अधिकारी!

नंदीग्राम अधिकारींचा गड!

नंदीग्राम हा मतदारसंघ पूर्व मिदनापूर जिल्ह्यामध्ये येतो. या जिल्ह्यात अधिकारी समुदायाचं वर्चस्व आहे. सुवेंदू अधिकारी, त्यांचे वडील आणि मनमोहन सिंह सरकारमध्ये मंत्री असलेले शिशिर अधिकारी आणि त्यांचे दोन भाऊ या कुटुंबाचं राजकीय वर्चस्व नंदग्राममध्ये असल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. त्यामुळे नंदीग्राम हा सुवेंदू अधिकारींसाठी सोपा पेपर होता. पण तोपर्यंतच जोपर्यंत त्यांच्यासमोर खुद्द ममता दीदींनीच आव्हान उभं केलं नाही!

टीएमसीला मतदान केले तर पश्चिम बंगालचा मिनी पाकिस्तान होईल, सुवेन्दु अधिकारी यांची ममतांवर टीका

ममतादीदींनी हक्काचा मतदारसंघ सोडला!

कोलकात्यामधला भोवानीपूर हा तसा ममता बॅनर्जींचा हक्काचा मतदारसंघ होता. या निवडणुकीत देखील मुख्यमंत्री त्याच मतदारसंघाची निवड करतील, असं मानलं जात होतं. पण घडलं उलटंच! ममता बॅनर्जी यांनी थेट अधिकारींच्या किल्ल्यातच उडी मारली आणि नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सुवेंदू अधिकारींनी तृणमूल सोडून भाजपाची वाट धरल्याच्या रागातूनच त्यांनी नंदीग्रामची निवड केल्याची चर्चा देखील पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे!

 

भाजपाची वाईल्ड कार्ड एंट्री!

दरम्यान, खुद्द ममतादीदींनीच बाह्या वाळून भाजपासमोर आणि अधिकारींसमोर शड्डू ठोकल्यामुळे भाजपासमोर पर्याय उरला नाही. पक्षात वाईल्ड कार्डने दाखल झालेले सुवेंदू अधिकारी यांच्याशिवाय भाजपाकडेही ममतादीदींसमोर सक्षम पर्याय नव्हता. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या गडालाच निर्माण झालेलं आव्हान झेलण्यासाठी सुवेंदू अधिकारीही सज्ज झाले.

माता-बहिणींचा आदर करण्यासाठी नंदीग्राम निवडले, ममता बॅनर्जी यांचे स्पष्टीकरण

अटीतटीचा सामना!

पश्चिम बंगालमधली हॉट टॉपिक ठरलेली ही लढत गेल्या महिन्याभरापासून बरीच रंगत आणते आहे. ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी हे दोघेही तृणमूलच्याच मुशीतले नेते असल्यामुळे दोघांनाही एकमेकांची मर्मस्थानं आणि कच्चे दुवे माहीत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार, आरोप-प्रत्यारोप असं चित्र मतदारांना पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आज नंदीग्रामच्या मतपेट्यांमध्ये मतदारराजा कुणाला कौल देतोय, याची उत्कंठा फक्त पश्चिम बंगालच नाही तर देशभरातल्या नागरिकांना आणि राजकीय धुरिणांना लागली असेल.

पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यात ३० जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये १७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नंदीग्राममध्ये मतदानाच्या दिवशी परिस्थिती संवेदनशील बनल्यामुळे या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Story img Loader