केंद्र सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावरून पुन्हा एकदा देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर आता विविध राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीही या निर्णायावरून केंद्र सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी आज मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना केंद्र सरकारच्या आणीबाणी संदर्भातील निर्णयाबाबतही विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी काही क्षण थांबून विचार केला आणि नंतर यावर उत्तर देत केंद्र सरकारला लक्ष्य केलं. देशात खरी आणीबाणी ही नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात लागू झाली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Samvidhaan Hatya Diwas : मोठी बातमी! ‘या’ दिनी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’; केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा!

नेमकं काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

देशात खरी आणीबाणी तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये लागू झाली आहे. याचं उदाहरण म्हणजे केंद्र सरकारने नुकताच फौजदारी कायद्यात बदल केले आहेत. त्या कायद्यात काय आहे, हे कुणालाही माहिती नाही. याबाबत सरकारने विरोधकांशी चर्चादेखील केलेली नाही. १४७ खासदारांना निलंबित करून हे तीन फौजदारी कायदे आणले आहेत, ही खरी आणीबाणी आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली. आम्ही आणीबाणीचं समर्थन करत नाही. मात्र, सरकारने ज्यापद्धतीने आणीबाणीसंदर्भात घोषणा केली आहे, ते चुकीचं आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

सरकारकडून ‘संविधान हत्या दिवस’ पाळण्याची घोषणा

दरम्यान, दरवर्षी २५ जून रोजी संविधान हत्या दिवस पाळणार असल्याचं घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भातील एक्स पोस्ट करून माहिती दिली. “२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हुकूमशाही मानसिकतेचे लाजिरवाणे प्रदर्शन करून देशावर आणीबाणी लादून आपल्या लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला. कोणताही दोष नसताना लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले आणि माध्यमांचा आवाज बंद करण्यात आला. भारत सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस १९७५ च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या मोठ्या योगदानाचे स्मरण करेल.”, असं अमित शाह म्हणाले.

हेही वाचा – “मुस्लीम राष्ट्रात असंच…”, जोडप्याला मारहाण प्रकरणी तृणमूलच्या आमदाराचे अजब विधान

भाजपाकडून सातत्याने काँग्रेसवर टीका

खरं तर आणीबाणीच्य मुद्द्यावरून भाजपाकडून सातत्याने काँग्रेसवर टीका केली जाते आहे. सध्या सुरु असलेल्या लोकसभा अधिवेशनातही आणीबाणीवरून मोठा गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं होतं. आणीबाणी म्हणजे संविधानाची हत्या असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली होती. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनीही आणीबाणीच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. काँग्रेस पक्षाने मूलभूत स्वातंत्र्य आणि भारताचे संविधान पायदळी तुडवले होते. केवळ सत्तेला चिकटून राहण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रत्येक लोकशाही तत्त्वाचा अवमान करून देशाला तुरुंगात टाकले होते”, अशी टीका त्यांनी आणीबाणीच्या ४९ व्या स्मृतीदिनी बोलताना केली होती.