पश्चिम बंगालमध्ये सोमवारी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात १० लोकांचा मृत्यू झाला आहे. या लोकांच्या घरांना आग लावण्यात आली, त्यात ते जिवंत जळाले आणि मरण पावले. याशिवाय मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले. या भीषण हिंसाचारानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपाने तृणमुल काँग्रेसवर जोरदार टीका केली. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर १० जणांना जिवंत जाळले
“मी हिंसाचाराचं समर्थन करत नाही. पण अशा घटना यापूर्वी राजस्थान आणि गुजरातमध्येही घडल्या आहेत. मी हिंसाचार झालेल्या रामपुरहाट गावात जाणार असून तिथल्या लोकांची भेट घेणार आहे. तसेच या प्रकरणाचा तपास योग्यरित्या केल्या जाईल,” अशी खात्री ममता बॅनर्जी यांनी बोलताना दिली.
बंगालमध्ये नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यातील बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची सोमवारी हत्या करण्यात आली. त्यानंतरच रात्री ही जाळपोळीची घटना घडली, ज्यात १० जणांना जिवंत जाळण्यात आले. भादू शेख हा बोगतुई गावचा रहिवासी होता. तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते भादू शेख यांच्यावर चार मोटरसायकलस्वारांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी तोंड झाकले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. गोळ्या झाडल्यानंतर लगेचच शेखला रामपूर हाट येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात १० जणांचा मृत्यू झाला.