Mamata Banerjee reaction on RG Kar Case Verdict : कोलकाता येथील आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी संजय रॉय याला सियालदह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला होता. तसेच देशभरातून याचा निषेध करण्यात आला होता. इतकेच नाही तर देशभरातील डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी या न्यायालयाने दिलेल्या निकालावर “मी समाधानी नाही”, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९ ऑगस्ट रोजी झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी संजय रॉय याला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांनी दोषी ठरवले होते. त्यानंतर दोन दिवसांनी ही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

“पहिल्या दिवसापासून आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी करत आहोत. प्रकरण आमच्याकडून (कोलकाता पोलीस) काढून घेण्यात आले आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरोने तपास केला.असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च शिक्षा व्हायला हवी होती,” असे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुर्शिदाबादमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

९ ऑगस्ट रोजी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर इतर सहकारी डॉक्टरांनी अनिश्चित काळासाठी संप जाहीर केला होता. या प्रकरणानंतर पश्चिम बंगालच्या विधानसभेत अपराजिता वूमन अ‍ॅण्ड चाइल्ड बिल (पश्चिम बंगाल गुन्हेगारी प्रतिबंध कायदा दुरुस्ती विधेयक २०२४) मंजूर करण्यात आले बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणात फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली. गेल्या सप्टेंबर महिन्यात मंजूर करण्यात आलेल्या या विधेयकाला अद्याप राष्ट्रपतींची संमती मिळणे बाकी आहे.

बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर तृणमूल काँग्रेस पक्षाने आरोपी रॉय याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत रॅली आणि आंदोलन केले होते. .

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee reaction on rg kar case verdict says not satisfied with punishment for sanjay roy rak