मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाला धूळ चारत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तृणमूल कॉंग्रेसने पुन्हा एकदा सरकार स्थापन करून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आव्हान पूर्णपणे मोडून काढले. बुधवारी ममता यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चुरशीची टक्कर असल्याचे सांगितले जात होते, परंतु ममता यांच्या नेतृत्वात त्यांच्या पक्षाने सर्व अंदाज खोटे ठरवत २९२ पैकी २३१ जागा जिंकल्या. भाजपाला केवळ ७७ जागा मिळाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा देत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर ममता यांनी पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर दिले. “धन्यवाद नरेंद्र मोदीजी, पश्चिम बंगालचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या सतत पाठिंब्याची मी अपेक्षा करते. मी माझ्या पूर्ण समर्थनासह आशा व्यक्त करते, की एकत्रितपणे आपण करोना साथीच्या आणि इतर आव्हानांशी लढा देऊ आणि केंद्र-राज्यांच्या संबंधात नवीन आदर्श घालून देऊ”, असे ट्वीट ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
Thank you @narendramodi ji for your wishes.
I look forward to the Centre’s sustained support keeping the best interest of WB in mind.
I extend my full cooperation & hope together we can fight this pandemic amid other challenges & set a new benchmark for Centre-State relations. https://t.co/DORcTPb2UG
— Mamata Banerjee (@MamataOfficial) May 5, 2021
बंगाल निवडणुकीत टीएमसीच्या विजयानंतर रविवारी नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर ममता यांचे अभिनंदन केले होते. “पश्चिम बंगाल मधील तृणमूल कॉंग्रेसच्या विजयासाठी ममता दीदी बधाई. केंद्र सरकार लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि कोविड -19 महामारीला दूर करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारला समर्थन देईल”, असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं होतं.
शपथविधीनंतर राजभवनात राज्यपालांसोबत उडाला खटका
शपथविधीनंतर राज्यपालांनी बंगालमधील हिंसाचाराकडे ममतांचं लक्ष वेधलं. “निवडणूक निकालानंतर उसळलेला संवेदनाहीन, भयंकर हिंसाचार संपवणे हीच आपली प्राथमिकता आहे. मला पूर्ण खात्री आहे की, कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री तात्काळ पावलं उचलतील. या परिस्थितीत माझी लहान बहीण कारवाई करेल, अशी मला आशा आहे. सरकार संविधान आणि कायद्यानुसार काम करून संघराज्य पद्धतीचा सन्मान करेल,” असं धनखार म्हणाले.
राज्यपालांनी मांडलेल्या भूमिकेवर ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिलं. राज्यपालांच्या हातातील माईक हातात घेऊन ममता म्हणाल्या,”मी आजच शपथ घेतली आहे. तीन महिन्यांपासून राज्य पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या हाती होतं. निवडणूक आयोगाने या काळात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नियुक्त्याही केल्या. ज्यांनी कोणतंही काम केलं नाही. अशा परिस्थिती आपण कामाला सुरुवात करत आहोत,” असं ममता म्हणाल्या.