पीटीआय, कोलकाता
कोलकात्यामधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा एका आठवड्यात तपास करण्यात पोलिसांना अपयश आल्यास, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले जाईल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी जाहीर केले. उत्तर कोलकात्यामधील आर जी कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील पदव्युत्तर विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्यामुळे राज्यात संतापाचे वातावरण आहे.
रुग्णालयाच्या परिसंवाद सभागृहामध्ये डॉक्टर तरुणीचा मृतदेह शुक्रवारी आढळला. तेव्हापासून राज्यात जनक्षोभ उसळला असून विविध सरकारी रुग्णालयांमधील शिकाऊ डॉक्टर, अंतर्वासित डॉक्टर आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर निदर्शने करत आहेत. दोषींना शिक्षा होईपर्यंत निदर्शने सुरूच ठेवणार असल्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. शिवाय दिल्ली, बंगळूरु येथेही निदर्शने सुरू आहेत. दिल्लीतील सरकारी रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांनी बेमुदत संपाचे आवाहन केले आहे.
हेही वाचा >>>Sheikh Hasina : “बांगलादेशमध्ये परत या, पण…”, शेख हसीना यांना अंतरिम सरकारचं आवाहन!
हत्याप्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयात तीन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकांवर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. टी. एस. शिवज्ञानम यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
पोलिसांनी शक्य तितक्या लवकर दोषींना अटक करावी. जर त्यांना रविवारपर्यंत या गुन्ह्याचा तपास लावता न आल्यास आम्ही हा तपास सीबीआयकडे सोपवू. सीबीआयच्या तपासात मला अडचण नाही, पण त्यांच्या यशाचे प्रमाण कमी आहे.- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल
© The Indian Express (P) Ltd