‘आरएसएस (ही संस्था) एवढीही वाईट नाही’ असं विधान करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी टोला लगावला आहे. ममता बॅनर्जींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक करणारा व्हिडीओ व्हायरल होत असून याच व्हिडीओला रिट्विट करत ओवेसींनी ममतांना एक जुना ऐतिहासिक संदर्भ देत शाब्दिक चिमटा काढला आहे.
नक्की वाचा >> “RSS ने २००४ मध्ये देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला”, माजी प्रचारकाचा धक्कादायक आरोप; Video शेअर करत काँग्रेस म्हणाली, “निवडणूका…”
व्हिडीओ प्रकरण काय?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कायमच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात एक विधान केलं असून त्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्यात. ममता यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘आरएसएस (ही संस्था) एवढीही वाईट नाही’ असं म्हटलं आहे. भाजपाच्या कट्टर विरोधक असणाऱ्या ममता यांनी भाजपाची मातृक संस्था असणाऱ्या संघाचं कौतुक केल्याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटत असून विरोधी पक्षाकडूनही ममतांचा हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.
ममता व्हिडीओत काय म्हणाल्या?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल सरकारच्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना दिसत आहेत. एका टेबल समोर त्या बसल्या असून मागे राज्य सरकारचं चिन्ह आणि भारताचे राष्ट्रीय ध्वज दिसत आहेत. बोलताना ममता या आरएसएसचा उल्लेख करता. या व्हिडीओमध्ये त्या, “आरएसएस एवढी वाईट नाही. आजही संघामध्ये असे काही लोक आहेत जे भाजपाप्रमाणे विचार करत नाहीत,” असं म्हणताना ऐकू येत आहे.
ओवेसींचा खोचक टोला
ममता बॅनर्जींचा हाच व्हिडीओ ट्वीट करत ओवेसींनी २००३ ची आठवण करुन दिली आहे. “२००३ मध्ये ममता बॅनर्जींनी आरएसएसला ‘देशभक्त’ म्हटलं होतं. त्याच्या मोबदल्यात आरएसएसने त्यांना ‘दुर्गा’ असं म्हटलेलं,” असं ओवेसींनी ट्वीटमध्ये अधोरेखित केलं आहे. तसेच “आरएसएसला हिंदूराष्ट्र हवं आहे. त्यांचा संपूर्ण इतिहास हा मुस्लीम विरोधातील द्वेषपूर्ण गुन्ह्यांनी भरलेला आहे. गुजरातमधील कार्यक्रमानंतर त्यांनी संसदेमध्ये भाजपा सरकारची पाठराखण केली होती. अपेक्षा आहे की तृणमूल काँग्रेसमधील ‘मुस्लीम चेहरे’ या इमानदारीसाठी आणि सातत्यासाठी त्यांचं कौतुक करतील,” असा चिमटा ओवैसींनी काढला आहे.
नक्की वाचा >> ओवेसी बंधूंनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत राज ठाकरे संतापले; म्हणाले, “यांच्यासारखे दळिद्री…”
भाजपावर टीका
याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी भाजपावर टीका करताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ममता यांनी केला आहे. मात्र आमच्या पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
…तर राजकारण सोडलं असतं
भाजपा घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप करत ममता यांनी एक मोठं विधान केलं आहे. तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. केवळ सूड उगवण्याच्या दृष्टीने राजकारण होत आहे असं नाही तर ही एक प्रकारची हिंसाच आहे, असंही ममता यांनी म्हटलं आहे. “मला आधी ठाऊक असतं की राजकारण पुढे जाऊन एवढं खराब होईल, राजकारण म्हणजे केवळ एकमेकांवर चिखल उडवण्याचं माध्यम ठरेल तर मी फार पूर्वीच राजकारण सोडलं असतं,” असंही ममता यांनी म्हटलं आहे. आपल्याला व आपल्या कुटुंबियांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही ममता यांनी केला आहे.
कुटुंबियांवरुन दिला इशारा…
केंद्र सरकार आपल्या कुटुंबाविरोधात कट रचत असल्याचा आरोप ममता यांनी केला आहे. कालच त्यांनी, “माझ्या कुटुंबियांपैकी कोणालाही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या तपास यंत्रणांकडून नोटीस मिळाली तर त्याला मी कायदेशीर मार्गाने उत्तर देईन,” असं म्हटलं होतं. सक्तवसुली संचलनालयाने कोळसा तस्करी प्रकरणामध्ये सुरु असणाऱ्या तपासादरम्यान ममतांचे भाचे आणि तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना शुक्रवारी केंद्रीय तपास यंत्रणांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिल्याच्या पार्श्वभूमीवर ममता यांनी हे विधान केलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक हे ममतांनंतरचे नंबर दोनचे महत्त्वाचे नेते आहेत.