Mamata Banerjee On BJP : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळवलेला विजय हा बनवट मतदार वापरून मिळवला असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी उपस्थित केला. कोलकाता येथील नेताजी इनडोर स्टेडियममध्ये तृणमूल कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना बॅनर्जी यांनी हा आरोप केला आहे. यावेळी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २९४ पैकी २९४ जागा जिंकण्याचे ध्येयही त्यांनी बोलून दाखवले. २०२१ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने २१४ जागा जिंकल्या होत्या.
“मी अभिषेक (पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी) यांच्याशी सहमत आहे. आपण २०२१ मध्ये जिंकल्या होत्या त्यापेक्षा किमान एक जागा जास्त जिंकली पाहिजे. आपल्याला २१५ जागा तर मिळाल्याच पाहिजेत आणि आपण त्याहून अधिक जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भाजपा, सीपीआयएम आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव होईल किंवा निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट होईल याची आपण काळजी घेऊ,” असेही बॅनर्जी म्हणाल्या.
यावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका देखील केली, तसेच त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मतदार यादीची प्रत्यक्ष पडताळणी सुरू करण्यास सांगितले. ममता बॅनर्जी यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) आशीर्वादाने मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही केला. निवडणुकीची तयारी करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे हे पहिले काम असेल असेही त्या म्हणाल्या. “बूथ कार्यकर्त्यांनी तात्काळ हे काम करायला सुरुवात करावी. जिल्हाध्यक्षांनी या प्रक्रियेवर देखरेख करावी आणि सात दिवसांच्या आत याबद्दलचा अभिप्राय द्यावा,” असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांनी यावेळी मतदार याद्यांच्या पडताळणीवर देखरेख ठेवण्यासाठी खासदार, आमदार आणि इतर काही नेत्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा देखील केली.
भारतीय जनता पक्षाने निवडणुका जिंकण्यासाठी बनावट मतदारांचा वापर केल्याच्या त्यांच्या दाव्याबद्दल बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “महाराष्ट्रातील पक्षांना (भाजपा सोडून) हे कसे आढळून आले नाही, दिल्लीतील पक्षांच्या हे लक्षात आले नाही. पण आमच्या हे लक्षात आले आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत विजय (भाजपाने) अशाप्रकारे मिळवला.”
ममता बॅनर्जी यांनी व्यासपीठावरून एक यादी देखील दाखवली आणि दावा केला की, ही यादी बनावट मतदारांची आहे. त्या म्हणाल्या की, “माझ्याकडे सर्व जिल्ह्यांमधील उदाहरणे आहेत. पश्चिम बंगालमधील रहिवाशांप्रमाणेच हरियाणा आणि गुजरातमधील लोकांची नावे यामध्ये आहेत, त्यांच्या सारख्याच EPIC सह (इलेक्शन फोटो आयडेंटी कार्ड) आहेत. बनावट मतदार ऑनलाइन वाढवले जातात.”
ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की भाजपा निवडणूक आयोगावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्या म्हणाल्या की, “मला निवडणूक आयोगाबद्दल आदर होता. पण आता असे दिसते की तो (निवडणूक आयोग) भाजपाच्या विचारांच्या लोकांनी भरलेला आहे. नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (ज्ञानेश कुमार) हे यापूर्वी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अंतर्गत सहकार विभागात सचिव होते. आपण दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ धरणे देखील बसू शकतो हे विसरू नका,” असेही त्या यावेळी म्हणाल्या.