आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती पश्चिम बंगालच्या निवडणुकांची! आणि त्याला कारण आहे ममता बॅनर्जी आणि भाजपा यांच्यामध्ये थेट होत असलेली टक्कर! या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना आता भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी नाव न घेता ममता बॅनर्जींविषयी केलेलं एक विधान चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दिलीप घोष यांनी या विधानामध्ये थेट ममता बॅनर्जी यांचं नाव घेतलेलं नसलं, तरी त्यांचं विधान हे ममता बॅनर्जींनाच उद्देशून असल्याचं सांगितलं जात आहे. प्लास्टर काढल्यानंतर देखील त्या बँडेज लावलेला पाय दाखवत आहेत, असं या व्हिडीओमध्ये दिलीप घोष म्हणत असल्याचं दिसून येत आहे. “त्यांनी साडी नेसली आहे आणि एक पाय झाकलेला आहे पण दुसरा नाही. अशी साडी कुणी नेसलेलं मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. जर त्यांना त्यांचा पाय दाखवायचाच असेल, तर त्यांनी बर्मुडा घालावा. त्यामुळे अधिक व्यवस्थित दिसू शकेल”, असं दिलीप घोष यांनी या व्हिडीओमध्ये म्हटल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केल्याचं सांगितलं जात आहे.

“या माकडांना वाटतं ते बंगालमध्ये जिंकतील?”

दिलीप घोष यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मैत्रा यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिलीप घोष यांच्यावर टीका केली आहे. “भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जाहीर सभेमध्ये विचारतात की ममता दीदी साडी का नेसतात? त्यांनी बर्मुडा घातला पाहिजे, म्हणजे त्यांचा पाय व्यवस्थित दिसेल. आणि या माकडांना वाटतं की ते बंगालमध्ये जिंकतील?” असं मैत्रा आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.

 

“दिलीप घोष यांनी मर्यादा ओलांडली!”

तृणमूलच्या दुसऱ्या एमपी काकोली दस्तीदार यांनी देखील दिलीप घोष यांच्यावर टीका केली आहे. “आता असं वाटतंय की भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचं काम आता फक्त विष ओकणं एवढंच राहिलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापासून तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांनी सोयीनुसार आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत”, असं दस्तीदार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.

 

ममता बॅनर्जींना १० मार्च रोजी एका प्रचारसभेदरम्यान पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर कोलकात्याच्या एसएसकेएम रुग्णालयात त्यांना दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं.

Story img Loader