आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती पश्चिम बंगालच्या निवडणुकांची! आणि त्याला कारण आहे ममता बॅनर्जी आणि भाजपा यांच्यामध्ये थेट होत असलेली टक्कर! या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना आता भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी नाव न घेता ममता बॅनर्जींविषयी केलेलं एक विधान चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दिलीप घोष यांनी या विधानामध्ये थेट ममता बॅनर्जी यांचं नाव घेतलेलं नसलं, तरी त्यांचं विधान हे ममता बॅनर्जींनाच उद्देशून असल्याचं सांगितलं जात आहे. प्लास्टर काढल्यानंतर देखील त्या बँडेज लावलेला पाय दाखवत आहेत, असं या व्हिडीओमध्ये दिलीप घोष म्हणत असल्याचं दिसून येत आहे. “त्यांनी साडी नेसली आहे आणि एक पाय झाकलेला आहे पण दुसरा नाही. अशी साडी कुणी नेसलेलं मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. जर त्यांना त्यांचा पाय दाखवायचाच असेल, तर त्यांनी बर्मुडा घालावा. त्यामुळे अधिक व्यवस्थित दिसू शकेल”, असं दिलीप घोष यांनी या व्हिडीओमध्ये म्हटल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केल्याचं सांगितलं जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा