West Bengal CM Mamata Banerjee Accident : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी दुखापतग्रस्त झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने त्यांच्या एक्स हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे. टीएमसीने त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “आमच्या अध्यक्षांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” टीएमसीने ममता बॅनर्जी यांचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्या कपाळाला गंभीर इजा झाल्याचं दिसत आहे. कपाळातून रक्तस्राव होत असून रक्ताचे ओघळ मानेपर्यंत घसरले आहेत. ममता बॅनर्जी यांना कोलकात्यामधील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
दुखापतीचे फोटो समोर येण्यापूर्वी ममता बॅनर्जी घरातल्या ट्रेडमिलवर चालताना पडल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केली होती. परंतु, तृणमूलने ज्या दुखापतीचं वृत्त जारी केलं आहे ती दुखापत नेमकी कशामुळे झाली आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी ममता यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
ममता बॅनर्जी यांचा दोन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. वर्धमान येथून कोलकात्याला जाताना ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाला होता. वर्धमानमधील पावसामुळे ममता बॅनर्जी नियोजित कार्यक्रम सोडून घरी परतत होत्या. शिवाय त्या हेलिकॉप्टरने प्रवास करू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या कारने माघारी परतत होत्या. परंतु, दाट धुकं पसरल्यामुळे कार चालवणं कठीण झालं होतं. तेव्हा त्यांच्या कारचा छोटा अपघात झाला होता. या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती.
हे ही वाचा >> २० वर्षांपूर्वी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यानेच केली होती CAA ची मागणी; वाजपेयी सरकारने काय केलं?
याआधी २०२१ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हा अनेक दिवस त्यांच्यावर उपचार चालू होते. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ममता यांच्या पायाला दुखापत झाली होती. नंदीग्राम येथील प्रचारसभा संपवून परतत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला होता.