पश्चिम बंगालमध्ये करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. करोना साथीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधे व उपकरणांच्या आयातीवरील करात सूट देण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. बंगाल आणि संपूर्ण भारतातील करोना संक्रमित रूग्णांच्या उपचारांसाठी आरोग्य पायाभूत सुविधा, औषधे आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याची मागणीही ममता यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ममता यांनी आतापर्यंत लिहिलेलं हे तिसरं पत्र आहे. तिसर्या कार्यकाळात शपथ घेतल्यानंतर ममतांनी बुधवारी राज्यातील कोविड संकटाविषयी पहिलं पत्र लिहिलं होतं. शुक्रवारी त्यांनी लिहिलेलं दुसरं पत्र ऑक्सिजन पुरवठा संकटावर प्रकाश टाकण्यासंदर्भात होते.
ममता बॅनर्जी यांनी पत्रात लिहिलं आहे की, कोविडशी लढण्यासाठी अनेक संस्था, व्यक्ती आणि परोपकारी संस्था यांनी ऑक्सिजन केंद्रे, सिलिंडर आणि कोविड -१९ औषधांची मदत देऊ केली आहे. अशा प्रकारच्या वस्तूंना जीएसटी व सीमा शुल्कातून सवलत द्यावी, जेणेकरून खासगी मदतीला प्रोत्साहन मिळू शकेल.
मदतीची ऑफर देणाऱ्यांनी या वस्तूंवरील शुल्क / एसजीएसटी / सीजीएसटी / आयजीएसटी सवलतीबाबत विचार करण्यासाठी राज्य सरकारकडे संपर्क साधला आहे. हे सर्व कर केंद्राच्या अखत्यारीत येतात, म्हणून मी केंद्र सरकारला विनंती करते की, या वस्तूंवरील करात सूट द्यावी जेणेकरून पुरवठ्यातील अडथळे दूर करण्यात मदत होईल. या देणगीदारांच्या मदतीमुळे राज्य सरकारला वैद्यकीय स्त्रोतांच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरून काढण्यास मदत होईल, असं ममता यांनी पत्रात लिहिलं आहे.
‘बंगालचा ऑक्सिजन दुसऱ्या राज्यांकडे’
ममता यांनी शुक्रवारी देखील नरेंद्र मोदींना पत्र लिहलं होते. यामध्ये त्यांनी बंगालमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढत असतानाही केंद्र सरकार बंगालचा ऑक्सिजन दुसऱ्या राज्यांकडे पाठवत असल्याचा आरोप केला होता. “बंगालची मेडिकल ऑक्सिजनची गरज गेल्या आठवड्यापासून ४७० मेट्रिक टनवरुन ५५० मेट्रिक टनपर्यंत पोहोचली आहे. बंगाल सरकारने यापूर्वीही केंद्राकडे हा विषय मांडला होता की आता बंगालला दररोज ५५० मेट्रिक टनची गरज भासत आहे” असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं.
ममता आपल्या पत्रात पुढे म्हणतात, “पश्चिम बंगालची ऑक्सिजनची गरज भागवण्याऐवजी भारत सरकारने पश्चिम बंगालमधील एकूण उत्पादनातून अन्य राज्यांचा ऑक्सिजन पुरवठा वाढवला आहे. गेल्या १० दिवसांपासून बंगालला प्रतिदिन ३०८ मेट्रिक टनच ऑक्सिजन मिळत आहे. मात्र, राज्याची गरज ५५० मेट्रिक टन प्रतिदिन इतकी आहे.”
बंगालमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये दैनंदिन कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आणि मतदानाच्या परिणामामुळे ही वाढ झाल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. राज्यात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान, मुख्यमंत्री बॅनर्जी आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांनी आयोजित केलेल्या मोर्चात आणि रोड शो मध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या २४ तासांत १९,००० नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आह. राज्यात आतापर्यंत १.२५ लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. आतापर्यंत सुमारे १२,००० पेक्षा जास्त लोक करोना संसर्गामुळे मरण पावले आहेत.