पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि आपल्या साध्या राहणीसाठी प्रसिद्ध असलेल्या ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्याच परदेश दौऱ्यासाठी सिंगापूरकडे प्रयाण केले. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपण या दौऱ्यावर जात असून, त्यातून आपण गुंतवणूकदारांना नक्कीच आकर्षित करू शकू, असा विश्वास ममता यांनी व्यक्त केला. विरोधक मात्र त्यांच्या दाव्यांच्या यशस्वितेबद्दल साशंक आहेत.
ममता यांच्या या भेटीत त्यांच्यासह अनेक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आणि काही उद्योजकही गेले आहेत. मात्र असे असले तरी त्यांच्याबरोबर असलेल्या शिष्टमंडळातील व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. तृणमूल काँग्रेस पक्षाची जमिनीविषयक धोरणे आणि सिंगूर येथे टाटा मोटर्सला गुंडाळावा लागलेला प्रकल्प या बाबी लक्षात घेता बॅनर्जी यांचा हा ‘महत्त्वाकांक्षी दौरा’ कितपत यशस्वी होईल, असा सवाल विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात आहे.
या पाच दिवसीय दौऱ्याबाबत भाजपचे सिद्धार्थनाथ सिंह यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. केवळ एकच दिवस बैठक नियोजित असताना ममता यांच्या पाच दिवसांच्या दौऱ्याचे प्रयोजन काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्या राज्यातून एतद्देशीय टाटांनी काढता पाय घेतला, त्या राज्यात अन्य कोणी उद्योजक गुंतवणुकीसाठी तयार होण्याची शक्यता सुतराम वाटत नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी केली.
ममता सिंगापूर दौऱ्यावर, पहिल्याच दौऱ्यात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि आपल्या साध्या राहणीसाठी प्रसिद्ध असलेल्या ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्याच परदेश दौऱ्यासाठी सिंगापूरकडे प्रयाण केले.
First published on: 18-08-2014 at 01:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee to visit singapore to attract investment