पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संबंध मोठ्या प्रमाणावर ताणले गेले आहेत. राज्यपाल सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याची टीका ममता बॅनर्जी सरकारकडून केली जात असताना राज्यपालांकडून देखील त्याला सडेतोड उत्तर दिलं जात आहे. राज्यातील महत्त्वाच्या दोन संस्थांमध्ये अशा प्रकारे कलगीतुरा सुरू असताना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खुद्द राज्यपाल जगदीप धनखार यांनी देखील हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. पूर्व मिदनापूरमध्ये आयोजित पोलिसांच्या एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे.
गेल्याच आठवड्यात ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखार यांच्यावर वरीष्ठ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप केला होता. यामधअये मुख्य सचिव आणि डीजीपींचा देखील समावेश आहे. भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते, तसेच ममता बॅनर्जी यांचे एके काळचे मर्जीतील नेते असणारे सुवेंदू अधिकारी हे पूर्व मिदनापूरचे असून नंदीग्राममध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
राज्यपालांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी पूर्व मिदनापूरच्या पोलीस अधीक्षकांना थेट राज्यपालांविषयी प्रश्न विचारताना दिसत आहेत. “राज्यपाल तुम्हाला थेट फोन करतात का? काय करा किंवा काय करू नका असे आदेश ते तुम्हाला देतात का? मला माहिती आहे की तुम्ही हे मान्य करणार नाही. पण त्यात तुम्ही नका पडू. तुम्हाला सोपवलेलं काम पार पाडण्याचा प्रयत्न करा. तुम्ही राज्य सरकारसाठी काम करत आहात हे लक्षात ठेवा. अशा गोष्टींना घाबरू नका”, असं ममता बॅनर्जी या अधिकाऱ्यांना बजावत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
“मी तुम्हाला इथे पाठवलंय जेणेकरून तुम्ही चांगलं काम कराल. पण माझ्याकडे तक्रारी येत आहे. जर तुम्हाला वाटलं की कुठल्यातरी राजकीय दबावामुळे तुम्हाला मोकळेपणाने काम करता येत नाही, तर तुम्ही थेट मला सांगू शकता. इतर कुणाचंही काही ऐकू नका”, असं देखील ममता बॅनर्जींनी या अधिकाऱ्याला सांगितलं आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देताना पूर्व मिदनापूरचे पोलीस अधीक्षक मात्र निरुत्तर झाले. पण त्यांनी याला स्पष्ट नकार देखील दिला नसल्यामुळे आता त्यावरून तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.