Mamata Banerjee Interested to Lead INDIA bloc Samajwadi Party Suports : “विरोधकांची इंडिया आघाडी मी बनवली आहे. सध्या इंडियाची घसरण होत असली तरी मला संधी मिळाल्यास मी ‘इंडिया’चं नेतृत्व करेन आणि आघाडीला पुढे घेऊन जाईन”, असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंलं आहे. एका बाजूला ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केलं आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांना पाठिंबा देखील मिळू लागला आहे. इंडिया आघाडीतील काही घटकपक्षांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. तर, समाजवादी पार्टीने मात्र ममता यांना पाठिंबा दर्शवला आहे. सपाने म्हटलं आहे की “ममता यांना इंडिया आघाडीचं नेतृत्व करायचं असेल तर त्यांनी करावं, आमचा त्यावर अजिबात आक्षेप नाही”. सपाचे नेते उदयवीर सिंह म्हणाले, “ममता बॅनर्जी या आमच्या इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्या आहेत. त्यांचा पक्ष सातत्याने भाजपाचा विरोध करत आहे. त्यांचा पक्ष भाजपाविरोधात आक्रमकपणे लढत आहे”.
उदयवीर सिंह म्हणाले, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बंगाल व उत्तर प्रदेशने एकत्र येत महत्त्वाची भूमिका निभावली होती. आमच्या एकत्र येण्याने इंडिया आघाडीला पुढे जाण्यास मदत झाली, इंडिया आघाडी मजबूत झाली. त्यामुळे उत्तर प्रदेश व बंगालमध्ये भाजपाची पिछेहाट झाली. इंडियातील सर्व पक्षांचा पाठिंबा असेल तर आम्ही देखील ममता यांना पूर्ण पाठिंबा देऊ. त्यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व केल्यास आमची त्यावर हरकत नसेल”.
हे ही वाचा >> दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या होत्या?
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीबाबत चिंता व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की “मला संधी मिळाल्यास मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास तयार आहे. मी सक्षमपणे आघाडीचं नेतृत्व करेन”. दरम्यान, “मी इंडिया आघाडी बनवली होती. जे लोक या आघाडीचं नेतृत्व करत आहेत त्यांनी ही आघाडी सांभाळली पाहिजे, अधिक सक्षम केली पाहिजे”, असं म्हणत बॅनर्जी यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, “जे लोक ही आघाडी सांभाळत आहेत त्यांना इतक्या पक्षांना बरोबर घेऊन पुढे जाता येत नसेल तर त्यात मी काय करू शकते. मी फक्त एवढंच सांगेन की सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, सर्वांनी एकजुटीने पुढे जायला हवं”.