नेहमी भाजपविरोधात भूमिका घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता दुर्गापुजेवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपला इशारा दिला आहे. दुर्गा पुजेवेळी कोणत्याही प्रकारची हिंसा झाली तर तुम्ही ‘आगीशी खेळता आहात’ हे लक्षात ठेवा असा सज्जड दमच ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

मोहरमच्या दिवशी आम्ही मूर्ती विसर्जन करणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. दुर्गा पुजे दरम्यान मात्र कोणतीही हिंसा खपवून घेतली जाणार नाही, असे ममतांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढत आहेत, त्यामुळे हा महिना संवेदनशील असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

यावर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोहरमचा सण येतो आहे. दोन्ही मिरवणुका समोरासमोर आल्या तर तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्याचमुळे हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी शांतता पाळावी, असेही आवाहन ममतांनी केले. इतकेच नाही तर मोहरमच्या दिवशी विसर्जन होणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

३० सप्टेंबरला संध्याकाळी ६ नंतर दुर्गा मुर्तींचे विसर्जन होणार नाही आणि १ ऑक्टोबरला मोहरम असल्याने त्या दिवशीही विसर्जन होणार नाही असे वक्तव्य ममतांनी मागील महिन्यात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. ममता बॅनर्जी दुर्गा मुर्तींच्या विसर्जनाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने त्यावेळी केला होता.

कोलकाता हायकोर्टाने दुर्गा मूर्ती विसर्जनासाठी ३० सप्टेंबरला रात्री १० पर्यंतची वेळ निश्चित केली आहे. १ ऑक्टोबरला मोहरम असल्याने त्यादिवशीऐवजी २ ऑक्टोबरला विसर्जन करता येईल असेही म्हटले आहे. त्यामुळे हा प्रश्न आता सुटला आहे. असे असले तरीही धार्मिक तेढ निर्माण व्हावी यासाठी समाजातील काही घटक प्रयत्नशील आहेत. त्यांनी मुळीच असे प्रयत्न करु नयेत असेही, ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. दुर्गा पूजा समित्यांची एक बैठक शनिवारी पार पडली त्यानंतर एएनआयशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader