पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी सध्या दिल्ली मुक्कामी आहे. ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं केंद्र असलेल्या दिल्लीनं सगळ्यांचीच त्यांच्यावर नजर आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांची भेट घेतलीच. पण, त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्याचबरोबर इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याही त्या भेटीगाठी घेत आहेत. ममता यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी त्यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे आक्रमक भाजपाविरोधात आक्रमक असलेल्या ममता यांच्याकडे विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व जाऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर आता ममता बॅनर्जी यांनीच भूमिका मांडली.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्लीत असून, काल (२७ जुलै) त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी कांग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. आजही (२८ जुलै) त्यांनी काही पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. आपल्या दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पेगॅसस हेरगिरी प्रकरणावर चिंता व्यक्त केली. देशातील सध्याची परिस्थिती आणीबाणीपेक्षाही गंभीर असल्याचा दावा त्यांनी केला. ममता म्हणाल्या,”पेगॅसस काय आहे? हा व्हायरस आहे. आपली सुरक्षा धोक्यात आहे. कुणालाही स्वातंत्र्य राहिलेलं नाही. माझा फोन हॅक करण्यात आला. अभिषेक बॅनर्जी यांचा फोन हॅक करण्यात आला; इतकंच नाही, तर प्रशांत किशोर यांचाही. तुम्ही जर एक फोन हॅक करत असाल, तुम्ही अनेकाचे फोन हॅक करू शकता. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. याची चौकशी व्हावी. कोणताही मुद्दा उचलला की ते दुर्लक्ष करतात, पण यालाही काही मर्यादा आहेत”, असं ममता म्हणाल्या.

पेगॅसस विकत घेतलं की नाही?; राहुल गांधी मोदी सरकारविरोधात आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात विरोधकांची आघाडी निर्माण होतं असल्याचं चित्र आहे. त्यासाठी प्रशांत किशोर यांच्याकडूनही प्रयत्न केले जात असल्याचं दिसत आहे. मात्र, या आघाडीचं नेतृत्व कोण करणार हे स्पष्ट झालेलं नाही. याबद्दल माध्यमांनी ममतांना प्रश्न विचारला. आघाडीचं नेतृत्व आपण करणार आहात का? त्यावर ममता म्हणाल्या,” मी राजकीय भविष्यवाणी करणारी व्यक्ती नाही. हे सर्व ज्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. सिस्टीम आणि पद्धतीवर अवलंबून असेल. राजकीय पक्ष एकत्रितपणे कसं काम करतात, त्यावर अवलंबून आहे. त्यातून नेतृत्व पुढे येईल. कुणीही नेतृत्व केलं तरी मला अडचण नाही. आम्ही त्याला पाठिंबा देऊ”, असं ममता म्हणाल्या.

भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचं त्यांनी आवाहन केलं. “काही राज्यात आता निवडणुका होत आहेत. आम्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांना वेळोवेळी भेटत आहोत. एकत्र येऊन काम करण्यासाठी व्यासपीठ असायला हवं. संसदेचं अधिवेशन झाल्यानंतर आम्ही एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल यांच्या भेटीत हाच मुद्दा उपस्थित केला. दररोज आम्ही एकमेकांशी बोलत आहोत”, असंही ममता यांनी सांगितलं.

Story img Loader