यूपीए म्हणजे काय? आता युपीए नाही या ममता बॅनर्जींच्या यांच्या मुंबईतील वक्तव्यांनंतर २०२४ पूर्वी राष्ट्रीय राजकारणात नव्या प्रकारचा प्रयोग होण्याची चिन्हे आहेत. ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचे अस्तित्व पूर्णपणे नाकारत आहे. पण काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी मोदी-शहा यांच्या भाजपाला तोंड देऊ शकत नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“ममता बॅनर्जी या देशातील मोठ्या नेत्या आहेत. भाजपाविरुद्ध जो लढा सुरु आहे त्यात महत्त्वपूर्ण लढा त्या देत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममतांनी ज्याप्रकारे संघर्ष करुन विजय मिळवला तो प्रेरणादायी आहे. तसेच महाराष्ट्रात निवडणुकांनंतर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार बनवले. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाने देशाला एक दिशा दिली आहे. युपीए कुठे आहे हा ममतांचा प्रश्न योग्य आहे. उद्धव ठाकरेंनीही वारंवार हाच प्रश्न विचारला आहे. जर युपीए नाही तर एनडीएसुद्धा कुठे आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. पण २०२४साठी वेगळी आघाडी उभी राहत असेल त्याचा काय फायदा होईल याचा विचार करायला हवा. जी आघाडी आधीपासून आहे त्याला आणखी मजबूत करा असे आमचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. काँग्रेसला दूर ठेवून कोणती आघाडी होत असेल तर हे योग्य नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“…तर भाजपाला समर्थ पर्याय द्यायच्या बाता कुणी करू नयेत”, शिवसेनेनं विरोधकांनाच दिल्या कानपिचक्या!
काँग्रेससोबत मिळून काम केले तर चांगली आघाडी तयार होईल. यूपीए महाराष्ट्रामध्ये आहे. महाविकास आघाडी त्याचेच प्रतिक आहे. ममतांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, असेही राऊत म्हणाले. “या गोष्टी सर्व आपल्याला विसरून जायला हव्यात. महाराष्ट्रातही आम्ही एकमेकांवर अनेक टीका करतो. पण भाजपाला थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत आणि दोन वर्षांपासून आमचे सरकार चालत आहे. आम्ही एकत्र येवून काम करु शकतो हा आदर्श आम्ही देशासमोर उभा केला आहे. आम्ही परत ममतांची भेट घेऊ. आता युपीएला सोनिया गांधी चालवत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर कोणी आक्षेप घेतलेला नाही. ममतांच्या मनात आधीपासून आहे की काँग्रेसने नेतृत्व करु नये पण संवादातून मार्ग निघेल,” असे संजय राऊत म्हणाले.
“आदित्य ठाकरे आणि माझ्यासोबत ममतांची चर्चा झाली आहे. ममतांनी एक विचार घेऊन शरद पवारांशी संवाद साधला आहे. ममतांच्या बोलण्यातही दम आहे की यूपीएचे आज अस्तित्व नाही. ममतांचे म्हणणे सत्य आहे. कोणतीही आघाडी बनली तर ती काँग्रेससोबतच बनेल. अनेक राज्यात काँग्रेस मजबूत स्थितीत आहे,” असे राऊत म्हणाले.