बिहारमधील पाटणा येथे सर्वपक्षीय विरोधकांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून आगामी निवडणुका एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली. बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व नेत्यांनी आपली मते मांडली. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही सरकारविरोधात आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. कितीही रक्त सांडलं तरी रक्त सांडू द्या, आम्ही देशाच्या जनतेची रक्षा करू, असा निर्धार ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला. ममता बॅनर्जी पत्रकार परिषदेत म्हणाल्या, “पाटणा येथील बैठकीमधून जनआंदोलनाला सुरुवात झाली आहे. याआधीही खूप सारे आंदोलन पाटणामधून सुरू झाले, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. यापूर्वी दिल्लीत आम्ही अनेक बैठका घेतल्या पण त्यातून काहीही सकारात्मक घडलं नाही. पण पाटणा येथील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.”
हेही वाचा- विरोधकांची बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आमच्यात मतभेद…”
“भाजपाचं सरकार हुकूमशहाकडून चालवलं जात आहे. जर कुणी सत्ताधारी पक्षाविरोधात बोललं तर त्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते. प्रसारमाध्यमांना पूर्णपणे नियंत्रित केलं आहे. वकिलांची फौज न्यायालयात पाठवून आमच्याविरोधात खटले दाखल केले जातात. पण ते (नरेंद्र मोदी) बेरोजगारीच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीत. सामान्य लोकांच्या हिताचं ते बोलत नाहीत. अर्थव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, दलितांवरील अन्याय यावरही काही बोलत नाही. आवास योजना, ग्राम सडक योजनेचे पैसेही दिले जात नाहीत,” अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
“त्यामुळे मोदी सरकारच्या काळ्या कायद्यांविरोधात आम्ही सगळे मिळून एकत्र लढाई लढू. कितीही रक्त सांडलं तरी सांडू द्या, पण देशाच्या जनतेची रक्षा करू. २०२४ ला पुन्हा हुकूमशाही सरकार सत्तेत आलं तर यापुढे देशात निवडणुकाच होणार नाहीत, असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे,” असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.