पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्या डोक्याला जखम झाल्याने त्यांना गुरुवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांच्या जखमेवर तीन टाके घालण्यात आले. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
डॉ. मणिमॉय बंदोपाध्याय काय म्हणाले?
पश्चिम बंगालमधील एसएसकेएम रुग्णालयाचे संचालक डॉ. मणिमॉय बंदोपाध्याय यांनी ममता बॅनर्जींसंदर्भात माहिती दिली. घरी पाय घसरून पडल्यानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी त्यांच्या जखमेवर टाके घालून उपचार केले. तसेच, त्यानंतर आवश्यक त्या सर्व तपासण्या देखील करण्यात आल्या आहेत.
ममता बॅनर्जींना धक्का कुणी दिला?
डॉ. मणिमॉय बंदोपाध्याय म्हणाले की, “आम्हाला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची माहिती मिळाली की, त्यांना कुणीतरी धक्का दिल्याने त्या घरात पडल्या आहेत. त्यांच्या डोक्याला जखम झाली असून कपाळ आणि नाकावर दुखापत झाली आहे. त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता.” ते पुढे म्हणाले की, “रुग्णालयातील एचओडी न्यूरोसर्जरी, एचओडी मेडिसिन आणि कार्डिओलॉजिस्ट यांनी ममता बॅनर्जींची तपासणी केली. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच, सर्व आवश्यक तपासण्या करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ” ANI ने हे वृत्त दिलं आहे.
दोन महिन्यांपूर्वीही झाला होता अपघात
ममता बॅनर्जी यांचा दोन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. वर्धमान येथून कोलकात्याला जाताना ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाला होता. वर्धमानमधील पावसामुळे ममता बॅनर्जी नियोजित कार्यक्रम सोडून घरी परतत होत्या. शिवाय त्या हेलिकॉप्टरने प्रवास करू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या कारने माघारी परतत होत्या. परंतु, दाट धुकं पसरल्यामुळे कार चालवणं कठीण झालं होतं. तेव्हा त्यांच्या कारचा छोटा अपघात झाला होता. या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती.